खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, "त्याने माझा..." | Molestation of women in west Khar Mumbai by Zepto Delivery boy | Loksatta

खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”

दोन दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाच्या एका महिला युट्यूबरचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला असताना मुंबईतील खार भागात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे.

खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
कारमधील विनयभंग प्रकरणातील आरोप (छायाचित्र सौजन्य – ट्विटर)

दोन दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाच्या एका महिला युट्यूबरचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलेला असताना मुंबईतील खार भागात आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. एका महिलेने झेप्टो नावाच्या वेबसाईटवरून केलेली ऑर्डन देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने या महिलेचा विनयभंग केला. वेळीच सुरक्षा रक्षकाने मदत केल्याने बचावल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित महिलेने या प्रकाराबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे, “मी ३० नोव्हेंबरला झेप्टो येथून घरगुती सामानाची ऑर्डर दिली होती. दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी डिलिव्हरी बॉय शाहजाद शेख ऑर्डर देण्यासाठी आला. मी गुगल पेवरून पेमेंट करत होते. तेव्हा तो लपून माझा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. मला त्याचा संशय आल्यावर मी याबाबत विचारलं. तेव्हा तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. अखेर मी त्याला त्याचा मोबाईल मला दाखवायला सांगितला. १५ मिनिटे त्याने मोबाईल दाखवला नाही. अखेर मी त्याला मोबाईल दाखव अथवा सुरक्षा रक्षकाला बोलावेन असं सांगितलं.”

“त्याने माझे हात पकडले आणि…”

“मी सुरक्षा रक्षकाला बोलावण्याविषयी बोलल्यावर तो माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात आला आणि माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मी घरात एकटीच होते. त्याने माझे हात पकडले आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागला. मला खूप मोठा धक्का बसला आणि मी किचनमध्ये पळाले. किचनच्या खिडकीतून मी सुरक्षा रक्षकाला हाक मारली,” अशी माहिती पीडितेने दिली.

“सुरक्षा रक्षकाने डिलिव्हरी बॉयला अडवले”

“सुरक्षा रक्षक आल्यानंतरही डिलिव्हरी बॉय ऐकण्यास तयार नव्हता. त्यानंतरही तो माझ्या दिशेने येत होता. अखेर सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले आणि त्याचा फोन घेऊन माझ्याकडे दिला. त्याच्या मोबाईलमध्ये माझा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ होता,” असंही पीडित महिलेने नमूद केलं.

“सुरक्षा रक्षक नसता तर?”

पीडिता पुढे म्हणाली, “सुरक्षा रक्षकाने मला वाचवलं. सुरक्षा रक्षक नसता तर? मला माझ्या घरीही सुरक्षित वाटू नये का? या प्रकारानंतर मी कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कसा विश्वास ठेवावा? झेप्टो अशाप्रकारे ग्राहकांना सेवा देतं का? हा प्रकार पश्चिम खारमध्ये माझ्या घरात घडला. झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयमुळे किती लोकांना अशाप्रकारांना सामोरं जावं लागलं मला माहिती नाही. झेप्टोवरून ऑर्डर करणाऱ्या महिलांना कोणतीही सुरक्षा नाहीये.”

झेप्टोचं म्हणणं काय?

पीडित महिलेने ट्विटरवर झेप्टोला आणि मुंबई पोलिसांना टॅग करत तक्रार केली. त्यावर झेप्टोने झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार व्यक्त केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीत स्थानिक पोलिसांना सहकार्य करत असल्याचं सांगत तक्रारीत तथ्य आढळल्यास आरोपीवर कठोर कारवाई करू असं म्हटलं.

हेही वाचा : Video: हात धरला, तोंड खेचलं आणि बघ्यांनी मला.. दक्षिण कोरियातील तरुणीने सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

“बोलून हा विषय संपवा”

झेप्टोच्या या प्रतिसादावर पीडित महिलेने पुन्हा ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं. महिला म्हणाली, “तुमची स्थानिक टीम मला बोलून हा विषय संपवा असं सांगत आहे. तुम्ही खरंच अशी कारवाई करणार आहात का? तुमच्यामुळे मला या भयानक प्रसंगातून जावं लागत आहे.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 09:22 IST
Next Story
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा