पोलीस दलाच्या वाढत्या विस्तारामुळे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळा’कडून २०११ पासून सुरू असलेले नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून संपूर्ण आधुनिक सुविधांनी युक्त असणारी ही सहा मजली इमारत पोलीस आयुक्तांचे प्रशासकीय कार्यालय म्हणून सेवेसाठी सज्ज झाली आहे. शासकीय कामाचा वाढलेला व्याप लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढावी यादृष्टीने नवीन इमारतीची अंतर्गत रचना व सजावट करण्यात आली आहे.
इमारतीच्या तळ मजल्यावर नागरिकांकरिता आधुनिक नागरिक सुविधा केंद्र, तसेच कर्मचाऱ्यांकरिता व्यायामशाळा व खाद्यगृहाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रशासकीय कक्ष निहाय कार्यालये असणार आहेत. याचबरोबर तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची संपूर्ण सुसज्ज कार्यालये असतील तर पाचव्या मजल्यावर नियंत्रण कक्ष व सी.सी. टिव्ही कमांडसेंटर तयार करण्यात आले आहे. याशिवाय सहाव्या मजल्यावर पोलीस कल्याण विभागाचे कार्यालय तसेच आधुनिक सोयींनी युक्त सभागृहही तयार करण्यात आले आहे.