मोनो प्रवाशांची सुरक्षितता अधांतरी

मोनोच्या डब्याला गुरुवारी लागलेल्या आगीनंतर हा प्रश्न आणखी उग्र भासू लागला आहे.

संकटसमयी उंच मार्गिकेवरून बाहेर पडण्याची सुविधाच नाही

मुंबईकर प्रवाशांना अपेक्षित सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या मोनोरेलच्या गुरुवारी झालेल्या अपघातानंतर या वाहतुकीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, उंचावर असलेल्या मार्गावरून धावणाऱ्या मोनोरेलमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना उंचावर अधांतरी उभे राहून मदतीची वाट पाहण्याखेरीज पर्याय नाही. मोनोच्या डब्याला गुरुवारी लागलेल्या आगीनंतर हा प्रश्न आणखी उग्र भासू लागला आहे.

‘एमएमआरडीए’ने मोनोरेलच्या प्रवाशांच्या सुरक्षेकडे तसेच देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. विद्युतपुरवठा खंडित होऊन प्रवाशांचा खोळंबा होण्याचे प्रकारही वारंवार घडत असतानाच आता पूर्ण डबाच भस्मसात झाला आहे. ही सेवा दुलक्र्षित झाली असून येथे फारसे कोणाचे लक्ष जात नसल्याबाबत वाहतूकतज्ज्ञांच्या वर्तुळात चिंतेचा सूर उमटत आहे. तोटय़ातील मोनोरेलकडे एकाही यंत्रणेचे योग्य लक्ष नसून सर्वानी मेट्रोकडे लक्ष केंद्रित केल्याचे मत वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले. हा मोनो मार्ग उंचावर असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना बाहेर पडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी दोन मार्गिकांच्या मध्ये एक माणूस चालू शकेल अशी सोय करण्याचा प्रस्ताव होता. प्रत्यक्षात ही मार्गिका बांधलीच गेली नसल्याने आवश्यक उपाय योजनांकडेच दुर्लक्ष सुरू असल्याचे मत वाहतूकतज्ज्ञ सुधीर बदामी यांनी व्यक्त केले. अग्निशमन दलाची गाडी आल्याशिवाय अपघातग्रस्तांना तेथून बाहेर पडण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. पर्यायी सुविधाही तुटपुंज्या आहेत, असेही ते म्हणाले.

मोनोरेलची अपघात मालिका

  • ८ जुलै २०१७ : चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेलचा विद्युतपुरवठा अचानक बंद झाला.
  • १ ऑगस्ट २०१६ : भक्ती पार्क स्थानकाजवळील माहुल खाडीजवळ सकाळी ७.३० वाजता रिकाम्या मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाला.
  • १० ऑगस्ट २०१६: लोअर परळ स्थानकाजवळ विद्युत कंडक्टर पिलरवर कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
  • १४ मार्च २०१५ : भक्ती पार्क स्थानकाजवळ सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रेलचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने सेवा विस्कळीत झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Monorail passeners seafty issue mmrda