मुंबई : देशासह महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष केरळ येथे मान्सून केव्हा दाखल होतो याकडे लागले होते. अखेरीस मान्सून आज गुरुवार, ४ जून रोजी केरळ येथे दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून राज्यातील दक्षिण किनारपट्टीवर मान्सून पुढील काही दिवसात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यंदा मोसमी वारे लवकर दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. हवामान विभागाने २६ मे च्या आसपास मान्सूनचे आगमन केरळ येथे होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मान्सूनची प्रगती संथ गतीने सुरु असल्याने केरळ येथे मान्सूनचे आगमन होण्यासाठी विलंब लागत होता. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने ४ जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, आज गुरुवारी केरळ येथे मान्सून दाखल झाला आहे. आग्नेय बंगालचा उपसागर, कर्नाटकचे काही भाग, तामिळनाडू, कोमोरिन परिसराचे उर्वरित भाग, केरळ, नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात वाटचाली केली आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पोषक वातावरण असल्यामुळे यंदा मोसमी वारे अंदमानमध्येही लवकर दाखल झाले होते. दरम्यान, १६ मे रोजी मोसमी वारे दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मोसमी वारे दाखल झाले होते. त्यानंतरही सुरुवातीला पोषक वातावरण असल्याने मोसमी वाऱ्यांची वाटचाल जलद गतीने सुरू होती. त्यामुळे मोसमी वारे केरळमध्ये २६ मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, वाऱ्यांची स्थिती, अरबी समुद्रातील चक्रवाती स्थिती याचा परिणाम म्हणून मान्सूनची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरु होती.

राज्यात आगमन कधी ?

पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मोसमी वारे संपूर्ण गोव्यासह राज्याच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज आहे. तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटकच्या काही भागांमध्ये,तामिळनाडूच्या उर्वरित भागांमध्ये, नैऋत्य बंगालच्या उपसागरात, ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्ये, ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मोसमी वारे दाखल होण्यास स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सून यापूर्वी केरळमध्ये दाखल होण्याचा दिवस

२०२५ – २४ मे

२०२४- ३० मे

२०२३- ८ जून

२०२२- २९ मे

२०२१- ३ जून

२०२०- १ जून

२०१९- ८ जून

२०१८- २९ मे

२०१७- ३० मे

२०१६- ८ जून

२०१५- ५ जून