मुंबई : राज्यातील मागील दोन आठवड्यांपासून एका जागी स्थिर असणार्या मोमसी पावसाने गेल्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वाटचाल केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित राज्यात मोसमी पाऊस पुढे सरकण्याची हवामान स्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून मोसमी पावसाची उत्तर सीमा दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे कायम होती. त्यानंतर मोसमी पावसाचा प्रवास एकाच जागी थांबल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती.
मात्र सोमवारपासून मोसमी पाऊस वेगाने पुढे सरकत पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत (पान २० वर) (पान १ वरून) पोहोचला होता. त्यानंतर चोवीस तासांत वेगात प्रवास करत मोसमी पावसाने मंगळवारी थेट विदर्भातील वर्धा आणि मुंबईसह पालघर जिल्ह्यातील डहाणूपर्यंत मजल मारत मोठा टप्पा सर केला.
यात संपूर्ण मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांचा समावेश आहे. त्यामुळे उष्णतेचा सामना करणार्या उत्तर कोकणासह विदर्भाला दिलासा मिळाला आहे. राज्यात कोकण पट्ट्यात पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसत असून रत्नागिरीसह काही भागांत मंगळवारी चांगल्या पावसाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत कोकण प्रदेशातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाचा जोर वाढणार?
मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २४ ते २७ जून दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून उत्तर कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
या संपूर्ण प्रदेशात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किमी वादळी वार्यांची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस
मुंबई : मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने मंगळवारी केली. मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. यंदा मुंबईत सरासरीपेक्षा १२ दिवस उशिरा मोसमी पाऊस दाखल झाला. मंगळवारी सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत कुलाबा येथे ३५.६ मिमी तर सांताक्रूझ येथे ८.९ मिमी पाऊस नोंदला गेला. पावसामुळे शहरात कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी घट झाली. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. ठाणे शहरात सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. याचा परिणाम सार्वजनिक वाहतुकीवरही झाला. टीएमटीच्या बसगाड्या तसेच रिक्षा थांब्यांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली.
