मुंबई : यंदा केरळ येथे उशिराने दाखल झालेला मोसमी पावसाने सरासरी तारखेच्या एक दिवस उशिराने म्हणजेच ९ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापला. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाने गुरुवारी उत्तर अरबी समुद्राच्या उर्वरित भागासह, हरियाणा, पंजाबमध्ये वाटचाल करत संपूर्ण देश व्यापला आहे. मोसमी पावसाची संपूर्ण देश व्यापण्याची तारीख ८ जुलै असून यंदा एक दिवस उशिरा मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे.

यंदा मोसमी पाऊस केरळ येथे सरासरी वेळेहून उशिराने दाखल झाला होता. दरम्यान, ६ जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मोसमी पावसाने ८ जूनपर्यत राज्यातील काही भागापर्यत मजल मारल्यानंतर मोसमी पाऊस दोन आठवडे एकाच जागी स्थिर होता. त्यानंतर मोसमी पावसाने २३ जून रोजी मुंबई आणि पालघरपर्यंत वाटचाल करून २४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. दरम्यान, मोसमी पाऊस केरळ येथे दाखल झाल्यानंतर ३५ दिवसांनी त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. दरम्यान गेल्या वर्षी २९ जून रोजी म्हणजेच सरासरी तारखेहून ९ दिवस अगोदरच संपूर्ण देश व्यापला होता. यंदा मोसमी पावसाच्या हंगामावर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच बुधवारपासून पुढील काही दिवस महाराष्ट्र, गुजरात तसेच मध्य प्रदेश आदी राज्यांसह काही राज्यात पावसाचा जोर लक्षणीय कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपूर्वी कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली होती. या दरम्यान काही भागात चोवीस तासात ५०० मिमीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून पुढील काही दिवसात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढील काही दिवसात राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे घाट विभाग तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागात वादळी पावसाचा ”यलो अलर्ट” हवामान विभागाने दिला आहे. तसेच काही भागात हलक्या सरींचा अंदाज असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.