मुंबई : र्नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती सुरू असताना महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा बसत आहे. मागील दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी वादळी पाऊस कोसळला. त्यामुळे काही भागांत फळबागांचे नुकसान झाले. दरम्यान, मोसमी पावसाची घोडदौड सुरूच असून, दक्षिणेच्या बाजूने प्रगती करीत नैऋत्य मोसमी वारे गुरुवारी अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाले आहेत.

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन – चार दिवसांत आणखी प्रगती करतील. पोषक वातावरणामुळे आज नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणखी काही भागात वाटचाल केली आहे. मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा भाग, तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरचा आणखी काही भाग, तसेच अंदमान आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली.

नैऋत्य मोसमी वारे आता श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत पोहचले आहेत. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांत मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव आणि कोमोरीनचा भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमानचा उर्वरित भाग आणि मध्य बंगालच्या उपसागराचा उरलेल्या भागात दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसासाठी पोषक वातावरण आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर जिल्ह्यांत काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे.

याचबरोबर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतही काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये !

यंदा केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.