मुंबई : यंदा केरळ येथे मोसमी पावसाचे आगमन लवकर होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून शनिवारी मोसमी पाऊस आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, नैऋत्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात तसेच अंदमान समुद्राच्या काही भागात आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह विजयपूरम येथे दाखल झाला आहे.
यंदा मोसमी पाऊस अंदमान येथे वेळेपूर्वीच दाखल झाला असून पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाची अधिक वाटचाल होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, केरळ येथे २६ मे च्या आसपास मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज यापूर्वीच भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
तसेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यताही खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मोसमी पावसाची सध्याची वाटचाल पाहता हवामानाची स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भात पारा ४६ अंशावर
राज्यात मागील काही दिवसांपासून विदर्भात उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थिती कायम असून यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानातही वाढ नोंदली जात असून काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, विदर्भात शनिवारी तापमानाचा पारा ४६ अशांवर पोहोचला. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अमरावती आणि वर्धा येथे झाली. येथे ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तर नागपूर ४३.८, अकोला ४५.४, ब्रम्हपुरी ४५.२, चंद्रपूर ४३.६, वाशीम ४३.२ तर यवतमाळ येथे ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुढील चार दिवस अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तर चंद्रपूर येथे सोमवारपासून पुढील दोन दिवस उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांना पुढील काही दिवस तीव्र उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसात १ ते ३ अंशांनी हळूहळू वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कसे
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची स्थिती आहे. मागील काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती होती. सध्या या प्रदेशात बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे असून काही ठिकणी पावसाची नोंद होत आहे. तर मराठवाड्याही सरासरी कमाल तापमानाहूमी १ ते २ अंश अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. शनिवारी परभणी येथे ४४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले.
दरम्यान, रविवारी कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, आदी भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या दरम्यान तशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील असाही हवामान विभागाचा अंदाज असून या भागांना रविवारी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोकणात दमट वातावरण कायम
कोकण प्रदेशात मागील काही दिवसांपासून उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून शनिवारीही ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे उष्ण आणि दमट वातावरण होते. दरम्यान, मुंबई येथेही मागील काही दिवसांपासून उन्हाची काहिली वाढली आहे. येथे सकाळच्या वेळेस ढगाळ वातावरणाची नोंद होत असून दुपारच्या वेळेस उन्हाचे चटके अधिक जाणवतात. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही वाढले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, शनिवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात ३४.१ तर कुलाबा केंद्रात ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे २७.८ तर सांताक्रूझ येथे २८.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात रविवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण प्रदेशातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
