मुंबई : हवामानात होणारे बदल, इंधन तुटवड्याचे संकट यातच आता मान्सून ओढ देण्याची शक्यता आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमीच राहणार असून सरासरीहून कमी पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केली. तसेच मान्सूनच्या हंगामात महाराष्ट्रासह देशातील काही भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती नोंदली जाईल, अशी शक्यात हवामान विभगाने वर्तवली असून यामुळे नागरिकांना यंदा पावसाच्या हंगामातही उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील सुधारित अंदाज शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून यात दीर्घकालीन अंदाज म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यात पर्जन्यमान कसे असेल याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच्या अंदाजात ९२ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
तो दोन टक्क्यांनी कमी करण्यात आला असून ९० टक्के असेल असा सुधारित अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जूनमध्ये ही पर्जन्यमान कमीच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे यावर्षी सरासरीहून कमीच पर्जन्यमान असेल असा अंदाज असून यामुळे इंधन टंचाईसह इतर समस्यांच्या सामना करणाऱ्या भारतीयांना आता हवामान बदलाच्या तीव्र झळा सोसाव्या लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून १३ एप्रिल रोजी मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला होता. त्यात ”एल निनो” स्थिती जून महिन्यात विकसित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. हीच शक्यता कायम ठेवण्यात आली असून पुढील काही महिन्यात ”एल निनो” स्थिती विकसित होईल सप्टेंबर महिन्यात ती अधिक तीव्र होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय असेल ?
राज्यात यंदा सरासरीहून कमी म्हणजेच ९४ टक्के पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभगाने शुक्रवारी व्यक्त केली आहे. यामुळे यंदा पाऊस ओढच देण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून सर्वांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र, यंदा राज्यात ही पर्जन्यमान कमीच असेल यामुळे शेकऱ्यांसह नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ शकतो अशीही शक्यता आहे.
तसेच उष्णेतही वाढ होईल यामुळे मान्सूनच्या हंगामातही उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. काही भागात सरासरीहून अधिक कमाल तापमान राहील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
