मुंबई : राज्यात वळिवाच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कोकणात, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पावसाने मंगळवारी दाणादाण उडवली होती. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.
वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच परिणाम म्हणून कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी वेगवान वाऱ्यांसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात पडणारा हा वळिवाचा पाऊस आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
पावसाचा अंदाज कुठे गडगडाटासह वादळी पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार,जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर</p>
सोसाट्याचा वारा, विजांसह पाऊस
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ
सर्वाधिक पावसाची नोंद सावंतवाडीत
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच मंगळवारी सकाळी ८:३० ते बुधवार सकाळी ८:३० पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे झाली. तेथे १३० मिमी पावसाची नोंद झाली. अनेक भागात मंगळवारी पावसाने जोर धरला. काही भागात पाऊस संपूर्ण दिवसभर कोसळत होता. तर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. सावंतवाडीबरोबरच मालवण येथे ११४ मिमी, रामेश्वर ११८.८ मिमी, रोहा ७८ मिमी, देवरुख ९५ मिमी आणि चिंचवड येथे १०१ मिमी पावसाची नोंद झाली.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला
नैऋत्य ेमोसमी वाऱ्यांनी बुधवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. मोसमी पावसाने बुधवारी दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली. मालदीव आणि कोमोरिनच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मोसमी पावसाने वाटचाल केली. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे नैऋत्य मोसमी वारे रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.