सर्व जण आतुरतेने ज्याच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहेत तो नैऋत्य मोसमी मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळ कोकणात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्याचे शुक्रवारी सकाळी भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मागच्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्याने तापमानात घट झाली असली तरी उकाडायापासून दिलासा मिळालेला नाही.

मुंबईकर अजूनही काही पावल चालल्यानंतर घामाच्या धारांनी भिजून निघत आहेत. त्यामुळे सर्वचजण चातकासारखी मान्सूनच्या पावासची वाट पाहत आहेत. मान्सूनने आता दक्षिण कोकणचा पट्टा व्यापला असून उद्यापर्यंत म्हणजे शनिवारी मान्सून मुंबईत धडकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या आठवडा अखेरीस कोकण आणि मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आधीच हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून पूर्व पावसाच्या सरींनी प्रशासनाची तयारी उघडी पाडली आहे. काल सखल भागात पाणी साचले होते तसेच लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. जून महिन्यात ही स्थिती असेल तर जुलै, ऑगस्टमध्ये काय होईल ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मुंबई सध्या मेट्रो प्रकल्प आणि अन्य कामांसाठी मोठया प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याची भिती आहे. मागच्या २४ तासा उमगरगाव, नंदूरबार २०८ मिमी, निलंगा लातूर १२९ मिमी, शिरुर १०५ मिमी, रत्नागिरी ६३ मिमी, मुंबईत ७४ मिमी, नांदेड ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.