scorecardresearch

मुंबईत बहावा बहरला, पाऊस लवकर येण्याचे संकेत

बहाव्याची झाडे पिवळय़ा फुलांनी डवरून गेली आहेत. झाडांचा हा बहर म्हणजे पाऊस लवकर येण्याचा संकेत मानला जातो.

मुंबई : तापमानाचा पारा चाळिशीपलीकडे गेलेला असला तरी या काळात रस्त्याच्या कडेने फुललेले बहाव्याचे झुंबर पाहून मात्र आल्हाददायक अनुभव येऊ लागला आहे. मुंबईबाहेर तसेच संपूर्ण मुंबईतही बहाव्याच्या झाडांना बहर आला आहे. बहाव्याची झाडे पिवळय़ा फुलांनी डवरून गेली आहेत. झाडांचा हा बहर म्हणजे पाऊस लवकर येण्याचा संकेत मानला जातो.

 उन्हाळा सुरू झाला की रस्त्यारस्त्यांवर पिवळय़ा फुलांचा सडा पडलेला दिसतो. यात बऱ्याच ठिकाणी सोनमोहोराच्या झाडांचा सडा पडलेला असतो. मात्र यंदा मुंबईत बहाव्याला चांगलाच बहर आला आहे. बहाव्याच्या पिवळय़ाधम्मक फुलांचा नजारा मुंबईकरांनाही सुखावू लागला आहे. मुंबईत बहाव्याची एकूण साडेचार हजार झाडे आहेत. या फुलांना बहर आल्यामुळे शहरापासून उपनगरातही नेत्रसुखद असे दृश्य पाहायला मिळते. पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी, पाऊस पडण्याची चाहूल देणारे विविध वृक्ष, पक्षी असून कोकिळेचे गाणे, कावळय़ाने घरटे बांधण्यास सुरुवात करणे, पळस व बहावा फुलणे ही पाऊस जवळ आल्याची चाहूल मानली जात असल्याचे सांगितले. वृक्ष हे केवळ सावलीबरोबरच ते निसर्गातील बदलांची चाहूलही देतात. बहावादेखील त्यापैकीच एक असून त्याला ‘नेचर इंडिकेटर’ असेही संबोधले जाते. पानझड सरून आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. सावर, पळस आदी वृक्ष पानाफुलांनी बहरू लागले आहेत. मात्र पिवळय़ाधम्मक फुलांची माळ असलेला बहावा सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. बहावा फुलला की पाऊस जवळ आला, असे म्हटले जाते. बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ ते ५० दिवसांनी पाऊस पडतो, असा संकेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monsoon showers expected early in mumbai zws

ताज्या बातम्या