मुंबई :देशासह राज्यातील विविध भागांमध्ये मान्सून पूर्व घडामोडींना वेग आला असून नागरिकांना आता मान्सूनचे वेध लागले आहेत. समस्त भारतवासीयांचे लक्ष आता केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होते याकडे लागले आहे. मात्र, मान्सूनची वाटचाल हवामान स्थितीतील अडथळ्यांमुळे काहीशी संथ होत असून यामुळे केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन होण्यास काहीसा विलंब होत आहे. यामुळे उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना आणखी काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे.
हवामानाच्या आतापर्यंतच्या नोंदीनुसार मान्सून केरळ येथे सरासरी वेळेनुसार १ जूनला दाखल होत असतो. मात्र, मागील काही वर्षांच्या हवामानाच्या नोंदी पहिल्या तर मान्सूनचे आगमन कधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, तर कधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाले आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल असून मान्सून केरळ आणि तामिळनाडू येथे दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
सध्या केरळमधील स्थिती काय ?
भारतीय हवामान विभागाने नुकताच प्रसिद्ध केलेल्या हवामान मॉडेलचा विचार करता, केरळ येथे ५ किंवा ६ जूननंतर मान्सूनला बळ देणारे वातावरणाच्या वरच्या स्तरातील मजबूत वारे स्थिर होण्याची शक्यात आहे. यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाची तीव्रता कमीच असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सुरुवातीला पावसाचे प्रमाणही कमी जास्त असण्याची शक्यता आहे., त्यांनतर मान्सूनची तीव्रता हळूहळू वाढत जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मान्सून तीव्र झाल्यास कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा काय ?
यावर्षी मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. केरळमध्ये २६ मेच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू असून हवामान विभागाकडून तारखा पुढे ढकलण्यात येत आहे. सध्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल असून पुढील २ ते ३ दिवसांत म्हणजेच ४ ते ५ जूनदरम्यान
मान्सून केरळच्या किनारपट्टीसह, उर्वरित अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्ष्यद्वीप बेट येथे दाखल होईल, अशी शक्यता आहे. केरळच्या काही भागात पूर्व मान्सून सरींनी हजेरी लावली असली तरी मान्सून जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अटी अजून पूर्ण झालेल्या नाहीत.
