मान्सून अपडेट : मुंबईत पावसाचा जोर वाढणार, ३ ते ५ जुलै दरम्यान मुसळधार

हवामान विभागाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र

जूनमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. सुरूवातील मुंबईत पावसानं हजेरी लावली, मात्र एका आठवड्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या पावसाची लागली आहे. मुंबईकरांची ही प्रतिक्षा लवकरच संपण्याची चिन्ह आहेत. पुढील आठवड्यात पाऊस मुंबईत परतणार असून, २ ते ४ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं असा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः ३ ते ५ जुलैच्या दरम्यान मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील चार दिवसात मुंबई व उपनगरात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसळीकर यांनीही ट्विट करून पावसाची माहिती दिली आहे. “मुंबईसह पश्चिम किनारपट्टी व उत्तर कोकण भागात २ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची अंदाज आहे. मुंबई व उपनगरात २ ते ४ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असं होसळीकर यांनी म्हटलं आहे.

पुणे वेधशाळेनंही आज (२९ जून) गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Monsoon update increase in rainfall in july first week says imd bmh

ताज्या बातम्या