मुंबई : राज्यात तीव्र उष्णतेमुळे नागरिकांची होरपळ होत असतानाच आता नागरिकांना मोसमी पावसाचे वेध लागले आहे. यंदा पाऊस वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती असून शनिवारी १६ मे रोजी अंदमान येथे पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केलेल्या अंदाजनुसार, केरळ येथे २६ मे रोजी मोसमी पावसाचे आगमन होईल. त्यामुळे राज्यातही पावसाचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे तर काही ठिकाणी सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४३ ते ४५ अशांवर पोहोचला आहे. काही ठिकाणी वादळामुळे पावसाची नोंद होऊन नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरीही नागरिकांना आता मोसमी पावसाचे आगमन कधी होणार हा प्रश्न सतावू लागला आहे. दरम्यान, यंदा पाऊस वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज असून यामुळे नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळेल असा अंदाज आहे.

दरम्यान, सध्या दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती असून शनिवारी अंदमान येथे पाऊस दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे यंदा केरळ येथेही पाऊस लवकर दाखल होईल, अशी शक्यता आहे. यानुसार केरळ येथे २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज असला तरीही या वेळापत्रकात चार दिवस पुढे – मागे होऊ शकतात असाही अंदाज आहे.

महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन कधी ?

सर्वसाधारणपणे १ जूनला केरळ येथे मोसमी पावसाचे आगमन होत असते. यानुसार यंदा मोसमी पावसाचे आगमन सहा दिवस आधी होऊ शकते. गेल्या वर्षी मोसमी पाऊस केरळ येथे २४ मे रोजी दाखल झाला होता. तसेच अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून वेगात २६ मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. साधारणपणे मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यांनतर १० ते १२ दिवसात महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर दाखल होत असतो. मात्र, परिस्थिती अनुकूल असेल तर मात्र पाऊस वेगात दाखल होत असतो. यंदाच्या हवामान स्थितीचा विचार करता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दक्षिण किनापट्टीवर मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.