लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत शनिवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला. मात्र त्याने काही काळ विश्रांती घेतली होती. मागील दोन दिवसांपासून शहर आणि उपनगरांत पावसाची रिपरिप सुरू झाली असून उपनगरांत पावसाचा जोर वाढू लागला आहे. शहरात शनिवारी पहाटेपासून पाऊस सुरू झाला असून दुपारी दोन वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच शहरात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आणखी वाचा-अश्वजित गायकवाड यांच्या विरोधातील हल्ल्याच्या आरोपाचे प्रकरण : तपासातील दिरंगाईवर न्यायालयाचे ताशेरे

यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. मुंबई आणि उपनगरांत बुधवारपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.