लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन १ जून रोजी अपेक्षित असते. मात्र, यंदा हवामान खात्याने सुरूवातीला वर्तवलेल्या अंदाजानुसार ४ जूनचा मुहूर्तही पावसाने चुकवला असून अद्याप केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झालेला नाही. केरळमध्ये मोसमी पावसासाठी अजूनही अनुकूल वातावरण नसून, आगमनासाठी आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे. वळीवाच्या पावसाने मात्र राज्यातील बहुतेक भागात हजेरी लावली आहे.




साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा मोसमी पावसाचा प्रवास संथगतीने सुरू आहे. केरळमध्ये ४ जूनला मोसमी पाऊस दाखल होऊन महाराष्ट्रात १० जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र मोसमी पाऊस केरळमध्ये चार ते पाच दिवस उशिरा येणार असल्याने महाराष्ट्रातही मोसमी पावसाला विलंब होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ७ ते ८ जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.तर महाराष्ट्रात साधारणपणे १३ते१५ जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा-मुंबई: दोनशे रुपये मिळवण्याच्या प्रयत्नात साडेसहा लाख रुपये गमावले
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून २.१ किलोमिटरपर्यंत पोहोचली आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मोसमी पाऊस सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती असेल.
एकूण पावसावर त्याचा परिणाम नाही.
मोसमी पावसाचे आगमन लांबले असले तरी एकूण पावसाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. दक्षिण पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी २९ मे रोजी, ३ जून २०२१, १जून २०२०, २०१९ मध्ये ८ जून आणि २०१८ मध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता.
आणखी वाचा- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात
वळीवाच्या पावसाचा अंदाड
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसहित वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच ७ आणि ८ जूनला विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या भागातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.