झोपुवासीयांच्या क्षेत्रफळावर उच्चभ्रूंचे इमले!

‘मोरदानी रिअल्टी’ला अखेर प्राधिकरणाचा तडाखा; सदनिकांच्या विक्रीवर बंदी

मोरदानी रिअल्टीला अखेर प्राधिकरणाचा तडाखा; सदनिकांच्या विक्रीवर बंदी

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा केवळ वाढीव चटई क्षेत्रफळासाठी वापर करून घेत खारसारख्या मोक्याच्या ठिकाणी के. मोरदानी रिअल्टीने २० मजली आलिशान टॉवर उभारल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी १७ सदनिका, बालवाडी, कल्याण केंद्र आदींचे चटई क्षेत्रफळ डय़ुप्लेक्स सदनिका उभारण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाल्याने या सदनिका विक्रीवर झोपु प्राधिकरणाने बंदी आणली आहे. विकासकाच्या मदतीसाठी राबणाऱ्या संबंधित अभियंत्यांच्या चौकशीचे आदेशही प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी विश्वास पाटील यांनी दिले आहेत.

खार जिमखान्याजवळ असलेल्या मोरदानी सिग्नेचर या अवघ्या साडेपाचशे चौरस मीटर जागेवर तब्बल २० मजली टॉवर उभा राहिला आहे. या जागेवर दोन इतके  चटई क्षेत्रफळ लागू होते. परंतु त्यात २० मजली टॉवर बांधता येत नव्हता. सुरुवातीला टॉवरसाठी नगररचना भूखंड असल्याचे स्पष्ट करीत महापालिककेकडून परवानग्याही मिळवल्या. त्यानुसार स्टिल्ट, पोडिअम आणि १३ मजल्यांपर्यंत टॉवर बांधता येत होता. परंतु झोपु योजनेला लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३(१४)ड नुसार, प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधून दिल्यानंतर त्याबाबत चटई क्षेत्रफळ वापरता येत होते. त्यामुळे २.५ इतके चटई क्षेत्रफळ (मूळ चटई क्षेत्रफळ एक आणि पॉइंट ७५ प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका तसेच इतर सुविधा तर पॉइंट ७५ खुल्या विक्रीसाठी) उपलब्ध झाले. परंतु प्रत्यक्षात खार येथील प्रकल्पात फक्त डय़ुप्लेक्स सदनिका बांधण्यात आल्या. झोपु योजनेतील सुधारणेनुसार लाभ उठवीत खारऐवजी जोगेश्वरी पूर्वेतील मजास येथे सुरू असलेल्या योजनेत प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधून देऊ असे स्पष्ट केले. परंतु तेथेही अद्याप सदनिका वा इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. अशातच खार प्रकल्पातील डय़ुप्लेक्स सदनिकांची विक्री सुरू करण्यात आली.

झोपु योजनेतील तरतुदीनुसार दोन योजना एकत्रित करता येतात आणि झोपुवासीयांसाठी घरे तसेच सुविधा एकाच योजनेत पुरविता येतात. के. मोरदानी रिअल्टीने याचा पुरेपूर वापर करीत खारसारख्या मोक्याच्या ठिकाणी अतिरिक्त चटई क्षेत्रफळ मिळविले. या परिसरातील जागेचा भाव ४० ते ६० हजार प्रति चौरस फूट आहे. या प्रकरणी सुनावणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी खार येथील प्रकल्पातील सदनिका विकण्यास प्रतिबंध केला असून ही योजना घाईत मंजूर करणाऱ्या संबंधित अभियंत्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

खार येथील टॉवर नियमानुसारच आहे. झोपुसाठी जोगेश्वरी येथील प्रकल्पात सदनिका बांधून देणार आहोत.   –  के. मोरदानी रिअल्टी, झोपु प्राधिकरणापुढील सुनावणीनुसार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mordani realty

ताज्या बातम्या