मुंबई : महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येणार असून नागरिकांना मुंबईत सुरक्षितपणे फिरता यावे, यासाठी कार्यरत राहणार, असे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलीस आयुक्त संजय पांडे गुरुवारी निवृत्त झाले. त्यांचा पदभार पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी त्यांनी मुंबईतील प्रत्येक घटनेचा, त्रुटीचा आढावा घेतला. वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक कोंडी हे आव्हान आहे. त्यांचा सामना करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले जाणार आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारास उत्तम वागणूक मिळेल, उत्तम व्यवहार केला जाईल, जेणेकरून पोलीस यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास आणखी वाढेल, असे फणसळकर यांनी  सांगितले.

 संजय पांडे यांनी संडे स्ट्रीटह्, रिमूव्ह खटारा यासारखी अभियाने सुरू केली. ती सर्व यापुढेही सुरू राहतील. वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठी असून वाहतूक सुरू राहावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे फणसळकर यांनी सांगितले.