मुंबई : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळिवाच्या पावसाने जोर धरला होता. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, १ मार्च ते २४ मे या कालावधीत सार्वाधिक पावसाची नोंद सातारा येथे झाली आहे. तेथे ४०१. ३ मिमी पाऊस नोंदला गेला. त्याखालोखाल रत्नागिरी येथे ३९४.८ मिमी पावसाची नोंद झाली.
मार्च ते मे या कालावधीत हवामान विभागाने राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. मे महिन्यात पावसाचा जोर वाढला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी काही भागात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, १ मार्च ते २४ मे या कालावधीत बहुतांश भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही वर्षांच्या तुलनेत यंदा पूर्वमोसमी किंवा वळिवाच्या पावसाचे प्रमाण या कालावधीत अधिक होते.
कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती आणि पावसाला पोषक वातावरणामुळे वळिवाचा पाऊस आणि मोसमी पावसाची सुरूवात दमदार झाली. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात वळिवाचे प्रमाण अधिक असते. या पावसाचा नियमित हंगामाशी थेट संबंध नसतो. तो अनपेक्षित आणि अल्पकाळ टिकणारा असतो. दरम्यान, १ मार्च ते २४ मे या कालावधीत राज्यातील बहुतांश भगात वळिवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यानंतर २५ मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल झाला. मात्र, १ मे पासून २४ मे पर्यंत राज्यात पावसाचा जोर अधिक होता. हंगामातील (१ मार्च ते २४ मे) सर्वाधिक पाऊस हा मे महिन्यातच पडला. त्यात सर्वाधिक पावसाची नोंद सातारा येथे ४०१. ३ मिमी इतकी झाली आहे. त्यानंतर रत्नागिरी येथे ३९४.८ मिमी, माथेरान २२४.८ मिमी , नंदुरबार २७५.७ मिमी, छत्रपती संभाजीनगर १५३.४ मिमी, नांदेड १२८ मिमी, परभणी ५९.५ मिमी, बीड ९८.२ मिमी, नाशिक १५१ मिमी, अहिल्यानगर १२१ मिमी, जेऊर १९१.६ मिमी, सोलापूर १३९.४ मिमी, कोल्हापूर १८९.२ मिमी, उद्गीर २५९ मिमी, बारामती १२९.९ मिमी, सांगली १९५ मिमी, मालेगाव ० मिमी, पुणे १५०.३ मिमी, सांताक्रूझ १३७.५ मिमी, हर्णे ८०.७ मिमी, कुलाबा १२४.२ मिमी, ठाणे १२४.९ मिमी आणि डहाऊ येथे ६२.५ मिमी पावसाची नोंद झाली.
आकडेवारीनुसार अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेने यंदा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसानही झाले आहे.