मुंबई : राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीत निवड झालेले सुमारे आठ हजार पोलिसांचे प्रशिक्षण ३१ ऑगस्टला पूर्ण होत आहे. त्यातील सात हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी मुंबईतील असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात ते मुंबई पोलीस दलात सामील होणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न बहुतांशी सुटणार आहे.

करोनामुळे सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे सुमारे तीन वर्ष पोलीस भरती झाली नव्हती. तसेच मिरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड ही आयुक्तालये वाढल्यामुळे २०२२ मध्ये राज्य पोलीस दलात १८ हजार ३३१ पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक म्हणजे सुमारे ८,०७६ पदांसाठी भरती झाली होती. त्यासाठी सात लाखांहून उमेदवारांनी अर्ज केले होते. गेल्यावर्षी झालेल्या या भरती प्रक्रियेत दोन लाखांपेक्षा अधिक उमेदवार मैदानी चाचणीत यशस्वी झाले होते. त्यानंतर लेखी परीक्षेनंतर निवड झालेल्या सर्वांना प्रशिक्षणासाठी राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांत पाठवण्यात आले होते. ते प्रशिक्षण पूर्ण करून सर्व तरुण सप्टेंबर महिन्यात मुंबई पोलीस दलात दाखल होणार आहेत.

आणखी वाचा-Supriya Sule: “बहिणीचं नातं भावांना कळलंच नाही, ते १५०० रुपयांत…”, सुप्रिया सुळेंची टीका

राज्यातील मरोळ, खंडाळा, दौंड, सांगली, सोलापूर, लातूर, जालना, धुळे, अकोला व नागपूर या १० प्रशिक्षण केंद्रांवर सुमारे आठ हजारांहून अधिक नव्याने भरती झालेल्या पोलिसांचे प्रशिक्षण सुरू असून ३१ ऑगस्टला ते संपणार आहे. त्यातील बहुतांश पोलीस मुंबई पोलीस दलातील असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक(प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले. राज्यातील १० प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण घेणारे आठ हजारांहून अधिक पोलीस प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे सात हजारांहून अधिक पोलीस मुंबई पोलीस दलातील आहेत. त्या व्यतिरिक्त पुण्यातील २५० पोलिसांचा समावेश आहेत.

मुंबई पोलीस दलात नवे कर्मचारी सामील होणार असल्याने अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचे संख्याबळ वाढण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे त्यात पोलीस शिपाई व पोलीस चालक या पदांचा समावेश आहे. मुंबई पोलीस दलात गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस चालक पदाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. हे नव्या दमाचे पोलीस सामील झाल्यामुळे प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे.

आणखी वाचा-निवासी डॉक्टरांचे शुक्रवारी दुपारी आझाद मैदानात आंदोलन

कुठे आणि किती जणांना पोलीस प्रशिक्षण ?

मरोळ- ५००

नाणवीज(दौंड)- ८००

सोलापूर- १२००

जालना- १२००

नागपूर- १२००

खंडाळा- ६००

तुरची(सांगली)- ६००

बाभूळगाव(लातूर)- ९००

धुळे- ६००

अकोला- ८००