खासगी केंद्रांपेक्षा दुपटीने वाढ; एका दिवसात ७३,०३६ जणांचे लसीकरण

शैलजा तिवले

मुंबई: लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार मुंबईत १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण पालिकेच्या केंद्रांवर सुरू केल्यानंतर मंगळवारी एका दिवसात ७३,०३६ जणांचे लसीकरण झाले आहे. मे महिन्यानंतर प्रथमच खासगी रुग्णालयांपेक्षा पालिका केंद्रावरील लसीकरण दुपटीहून अधिक झाले आहे. आता खासगी केंद्रांना लसीकरणाला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

लशींचा साठा खासगी रुग्णालयांसाठी १ मेपासून खुला करण्यात आला. एकीकडे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी खासगी रुग्णालयात लसीकरण खुले झाले आणि दुसरीकडे पालिकेच्या केंद्रावर लशीचा साठा अपुरा असल्यामुळे लस उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे खासगी केंद्रावरील लसीकरणाचा प्रतिसाद वाढत गेला. लससाठा पुरेसा येत नसल्याने मुंबईत पालिकेच्या केंद्रावर प्रतिदिन सुमारे २५ ते ३० हजार जणांचे लसीकरण केले जात होते. मात्र त्याचवेळी खासगी केंद्रांवर याच्या दुप्पट म्हणजे सुमारे ४० हजार नागरिकांना लस देण्यात येत होती. जूनमध्ये तर हे प्रमाण ५० ते ६० हजारांवर पोहोचले. जूनच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत झालेल्या एकूण लसीकरणापैकी ७७ टक्के लसीकरण हे खासगी केंद्रामध्ये, तर केवळ २० टक्के पालिकेच्या केंद्रावर केले गेले.

लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार मुंबईत २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण खुले केले. लशीचा साठाही पुरेसा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे सोमवारपासूनच लसीकरणाला प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. मंगळवारी एका दिवसात पालिकेने ७३,०३६ तर सरकारी केंद्रावर ५७९१ जणांचे लसीकरण केले गेले. यात ३० ते ४४ वयोगटातील ५०,९२९ जणांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे.