संपूर्ण देशभरात सध्या १५० दशलक्ष भारतीय इंटरनेटचा वापर दररोज करतात, त्यामध्ये ६० दशलक्ष महिलांचा समावेश आहे. दैनंदिन जीवनाबरोबरच महिलांचे जीवन सौंदर्यपूर्ण करण्याच्या दृष्टीनेच प्रामुख्याने महिलांचा इंटरनेट वापर होताना दिसतो. त्यातही केसांची काळजी, त्वचेची निगा, लहान मुलांची काळजी घेणारी उत्पादने आणि सौंदर्यप्रसाधने या सर्वाच्या बाबतीतील निर्णय महिला प्रामुख्याने ऑनलाइन सर्च करून नंतरच घेऊ लागल्या आहेत. भारतीय महिला खरेदीदारांमध्ये झालेला हा खूप मोठा बदल आहे, असा निष्कर्ष काढणारा अहवाल आज गुगल इंडियाने जारी केला.
शोधफायदा काय?
गुगलवर भारतीय महिलांकडून केल्या जाणाऱ्या ‘सर्च’च्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले, त्यासाठी टीएनएस ऑस्ट्रेलिया या सर्वेक्षण करणाऱ्या एका स्वतंत्र संस्थेचीही मदत घेण्यात आली. गुगलचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन या सर्वेक्षण अहवालासंदर्भात म्हणाले की, या सर्वेक्षणातून समोर आलेल्या या आकडेवारीनंतर ज्या ज्या खरेदीदारांच्या क्षेत्रात महिला प्रभावी आहेत, त्या सर्व क्षेत्रांमधील उत्पादकांना आता त्यांचे मार्केटिंगचे डावपेच बदलावे लागतील, असे लक्षात येते आहे. भारतात सर्वाधिक जाहिराती पूर्वी वर्तमानपत्र किंवा साप्ताहिकांमध्ये होत्या. मध्यंतरी ते सारे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या दिशेने सरकले होते. आता पुढच्या टप्प्यामध्ये उत्पादकांना इंटरनेटचा वापर त्यासाठी करावा लागणार आहे. आता इंटिरनेटवरून माहिती घेऊन महिलांकडून निर्णय घेतले जातात.
विशेष काय?
 इंटरनेटच्या या वापरामध्येही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे मोबाईलवरून होणारा इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या ७५ टक्के महिला या १५ ते ३४ या वयोगटातील आहेत. खाण्यापिण्याच्या संदर्भातील सर्चची संख्या महिला वर्गाच्या बाबतीत खूप मोठी आहे. यात केवळ हॉटेलिंगचा समावेश नाही तर रेसिपींपासून ते विशिष्ट खाद्य पदार्थाच्या गटांपर्यंत सर्वाचा समावेश आहे. सर्वाधिक सर्च ७२ टक्के त्वचेची काळजी घेणारी उत्पादने, त्या खालोखाल ६९ टक्के लहान मुलांची काळजी घेणारी उत्पादने आणि केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनासाठी ६५ टक्के सर्च अशी टक्केवारी आहे, असेही आनंदन म्हणाले.