मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेने आता धोक्याची पातळी गाठली असून ‘हीट वेव्ह’चा परिणाम केवळ दुपारच्या कडक उन्हापुरता मर्यादित नसल्याचे समोर येत आहे. सकाळी थंडावा असल्याचा समज अनेकांसाठी घातक ठरत असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेत ६० वर्षीय व्यक्ती मॉर्निंग वॉकदरम्यान अचानक कोसळल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या मते हा प्रकार ‘हीट स्ट्रेस’मुळे घडला असून तो अधिक धोकादायक आणि अनेकदा नजरेआड राहणारा असतो.
सदर व्यक्ती नेहमीप्रमाणे सकाळी चालण्यासाठी बाहेर पडली होती. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत असतानाच काही वेळात त्यांना चक्कर येणे, प्रचंड घाम येणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. मात्र, काही मिनिटांतच घाम येणे थांबले आणि स्थिती अधिक गंभीर बनली. त्यानंतर मळमळ, श्वास घेण्यास त्रास आणि गोंधळलेली अवस्था निर्माण झाली. अखेरीस ते रस्त्यावरच कोसळले. तातडीने उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आले परंतु या घटनेने हीट वेव्हच्या धोक्याची तीव्रता अधोरेखित केली आहे.
डॉक्टरांच्या मते, हीट स्ट्रेस हा शरीरावर हळूहळू परिणाम करणारा ‘सायलेंट अटॅक’ आहे. शरीराचे तापमान नियंत्रण यंत्रणा अपयशी ठरल्यास हृदय, मेंदू आणि किडनी यांच्यावर प्रचंड ताण येतो. उष्णतेमुळे रक्तवाहिन्या विस्तारतात, रक्तदाब कमी होतो आणि हृदयाला अधिक वेगाने काम करावे लागते. त्याचबरोबर घामामुळे शरीरातील पाणी व मीठ कमी होऊन डीहायड्रेशनचा धोका वाढतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम गंभीर आरोग्य बिघाडात होऊ शकतो.विशेष म्हणजे या हीट स्ट्रेसची सुरुवात साध्या लक्षणांपासून होते .जसे की चक्कर येणे, अशक्तपणा, जास्त घाम येणे.
परंतु स्थिती बिघडत गेल्यास घाम येणे अचानक थांबते, गोंधळ निर्माण होतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. ही लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय मदत घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. भारतातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. अनेक भाग ‘हीट रिस्क झोन’मध्ये गेले असून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या याचा फटका सहन करत आहे. शहरांमध्ये ‘हीट आयलंड’ प्रभावामुळे तापमान आणखी वाढून शरीरावर ताण अधिक वाढतो.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याचा वेळ असला तरी उष्णतेचा परिणाम कमी झालेला असतोच असे नाही. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे, थेट उन्हात जास्त वेळ न राहणे आणि शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष न करणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहाता हीट वेव्हचा धोका आता अधिक गंभीर स्वरूप धारण करत असून तो ‘सायलेंट किलर’ म्हणून समोर येत आहे. वेळेवर काळजी घेतली नाही तर साधी मॉर्निंग वॉकदेखील जीवघेणी ठरू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
