मुंबई : मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आराखड्याच्या सादरीकरणादरम्यान एका रहिवाशाला त्याची दाढी पाहून तू घुसखोर आहेस का, तुझे आयकार्ड दाखव, तू घुसखोर असशील तर तुला इथूनच उचलेन. तसेच ज्यांनी घरे भाड्याने दिली असतील त्यांना घरे मिळणार नाहीत, तुमच्या घरांचे हस्तांतरण कसे होते ते मी पाहतो, अनधिकृत बांधकाम केले आहे का याचे सर्वेक्षण करतो अशी धमकी देणाऱ्या म्हाडा उपाध्यक्षांबाबत मोतीलाल नगरवासियांमध्ये रोष आहे. रहिवाशांना विश्वासात घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याऐवजी रहिवाशांना धमकावणारा अधिकारी नको, जयस्वाल यांना म्हाडा उपाध्यक्ष पदावरून हटवावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
जयस्वाल यांनी रहिवाशांची माफी मागावी अशी ठाम भूमिका आता रहिवाशांनी घेतली आहे. या मागणीचे पत्र सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाणार आहे. दरम्यान जयस्वाल यांच्या वक्तव्यांचा निषेध करणारे फलक आता मोतीलाल नगरमध्ये लावण्यात आले आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मोतीलाल नगरचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. या पुनर्विकासाचा सविस्तर आराखडा कंत्राटदार अदानी समूहाकडून तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे सादरीकरण रहिवाशांसाठी शुक्रवारी सायंकाळी मोतीलाल नगर येथील गणेश मैदानावर आयोजित करण्यात आले होते. मोतीलाल नगरवासीयांची २४०० चौ. फुटांच्या (कार्पेट) घराची मागणी आहे.
या मागणीकडे कानाडोळा करून म्हाडाकडून प्रकल्प मार्गी लावला जात असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी असून यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जयस्वाल यांनी सादरीकरणास सुरुवात केल्यानंतर काही वेळाने रहिवाशांनी आपल्या २४०० चौ. फुटांच्या घरांच्या मागणीचे फलक दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र जयस्वाल यांचा ताबा सुटला आणि त्यांनी थेट रहिवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. मागणीचा फलक दाखविणाऱ्या तरुणांची दाढी पाहून तो मुस्लीम असल्याचे दिसताच तू घुसखोर आहेस का? तुझे आयकार्ड दाखव.
तुझी कागदपत्रे तपासतो आणि जर तू घुसखोर निघालास तर तुला इथूनच उचलेन अशा शब्दांत धमकावले. पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात घ्यायला लावले. यावरच ते थांबले नाहीत तर प्रकल्पाबाबत रहिवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जाणार म्हणताच त्यांनी आवाज चढवत, ठीक आहे तुम्हाला नको ना पुनर्विकास, मी प्रकल्प थांबवतो, गौतम अदानीला तसं सांगतो असे ते यावेळी म्हणाले.
तसेच माझ्यासोबत बैठकीचे इतिवृत्त तुम्ही परस्पर जाहीर करता, तुमच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करेन. येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे, त्याचे उसापासूनच सर्वेक्षण सुरू करेन. अनिवासी क्षेत्र किती वाढवले हे पाहायला लावू नका. माझ्या संयमाचा अंत पाहू नका. तुमच्या घराचे हस्तांतरण कसे होते ते मी पाहतो. तुम्ही भाड्याने दिलेली घरे भाडोत्रीच्या नावावर करतो अशा एक ना एक धमक्या यावेळी जयस्वाल यांनी दिल्या.
जनसभा म्हणून ही सभा आयोजित केली असताना जयस्वाल रहिवाशांशी संवाद न साधता त्यांना धमकावून गेले. यानंतर संतप्त रहिवाशांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत रहिवाशांना धमकावण्यासह दाढी पाहून घुसखोर म्हणत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याने रहिवाशांनी यासाठीचा तक्रार अर्ज दाखल केला. आता मोतीलाल नगर विकास समितीने, रहिवाशांनी जयस्वाल यांच्या बदलीची मागणी उचलून धरली आहे. रहिवाशांना धमकावत प्रकल्प मार्गी लावणारा अधिकारी आम्हाला नको, मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी तर हा अधिकारी नकोच नको असे म्हणत आता जयस्वाल यांची म्हाडातून तातडीने बदली करावी अशी आमची मागणी असल्याचे मोतीलाल नगर विकास समितीचे सचिव निलेश प्रभू यांनी सांगितले. तर जयस्वाल यांनी तातडीने रहिवाशांची माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तर या मागणीचे पत्र सोमवारी मुख्यमंत्र्यांना देऊ असेही ते म्हणाले.
सनदी अधिकाऱ्याचे असे वागणे योग्य नाही. मर्यादेचे भान राखले पाहिजे. जयस्वाल हे आपण मालक असल्याच्या अभिर्भावात बोलत होते असे बोलणे अयोग्य आहे. अशी भाषा सनदी अधिकार्यांना शोभत नाही. त्यामुळे जयस्वाल यांनी रहिवाशांची माफी मागावी – प्रवीण दरेकर
