लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मोतीलाल नगरचा पुनर्विकास आम्ही मार्गी लावत आहोत. त्याचा आराखडा आज सादर करण्यात आला. आता रहिवाशांना १६०० चौरस फूट कार्पेट क्षेत्राचे घर दिले जाणार आहे. तुम्हाला हे क्षेत्र मान्य नसेल, पुनर्विकास नको असेल तर तसे मला सांगा, मी पुनर्विकास थांबवतो, अशी आक्रमक भूमिका म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतली. मोतीलाल नगर पुनर्विकास आराखडा सादरीकरणासाठी म्हाडा आयोजित जनसभेत आपल्या मागण्यांविषयी काही रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी आक्रमक होत व्यासपीठाववरून थेट पुनर्विकास थांबतो असा इशारा दिला आणि रहिवाशांशी संवाद न साधता ते निघून गेले. त्यानंतर मात्र काहीसा गोंधळ झाला. एकतर्फी संवाद झाल्याने आणि जयस्वाल यांनी आपल्याला थेट धमकल्याचा आरोप करीत रहिवाशांना गोंधळ घातला.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोतीलाल नगर पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून राबवला जात आहे. रहिवाशांना विश्वासात घेत प्रकल्प राबवू असे म्हणत म्हाडाने पुनर्विकास आराखडा रहिवाशांना समजावून देण्यासाठी शुक्रवारी एका जनसभेचे आयोजन केले होते. मोतीलाल नगर येथील गणेश मैदानावर शुक्रवारी सायंकाळी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जयस्वाल रहिवाशांच्या प्रश्नांना उत्तर देणार होते, संवाद साधणार होते. मात्र काही रहिवाशांनी २४०० चौरस फुटांच्या (कार्पेट क्षेत्र) घराची मागणी केली. काहींनी या मागणीचे फलक झळकवले. तुमची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ठेवू असे सांगत जयस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच एका रहिवाशाने उभे राहून मागण्यांच्या फलक दाखवल्यानंतर मात्र जयस्वाल प्रचंड संतापले. तुम्हाला पुनर्विकास नको असेल तर सांगा मी प्रकल्प थांबवतो, असा इशारा देत रहिवाशांशी कोणताही संवाद न साधता ते निघून गेले. त्यामुळे रहिवासी नाराज झाले. तू घोसखोर आहेस का ?, असे फलक दाखविणाऱ्या रहिवाशाला त्यांनी विचारले आणि काही अपशब्द वापरले. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले. त्यांनी याचा निषेध केला. त्यानंतर काहीसा गोंधळ झाला.

दरम्यान, जयस्वाल यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोुप करीत काही रहिवाशांनी नजिकच्या पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे पोलिसांनी रहिवाशांना सांगितले. त्यानंतर रहिवाशांनी यासंबंधीचे निवेदन पोलिसांना देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असे मोतीलाल नगर संघर्ष समितीकडून सांगण्यात आले.