Motorcycle robbery thief Sakinaka and Meghwadi police arrested both Mumbai print news ysh 95 | Loksatta

अशा पळविल्या मोटारगाड्या…; साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक

विश्वासाने दिलेल्या तीन महागड्या मोटरगाड्या घेऊन पळून गेल्याप्रकरणी दोघांना साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी अटक केली.

अशा पळविल्या मोटारगाड्या…; साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबईः विश्वासाने दिलेल्या तीन महागड्या मोटरगाड्या घेऊन पळून गेल्याप्रकरणी दोघांना साकिनाका आणि मेघवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर जलालउद्दीन कादरी व सुशांत पुजारी डोंगरे अशी या दोघांची नावे आहेत. ६२ वर्षांचे शिवराम दत्तू रामबाडे हे जोगेश्वरी येथे राहतात. ते बेस्टमधून चालक म्हणून निवृत्त झाले होते. २०१५ साली त्यांनी ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी एक स्विफ्ट कार खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले होते. त्यांनी सुशांत डोंगरे याला दरमहा अठरा हजार रुपयांच्या भाड्यावर मोटरगाडी चालविण्यासाठी दिली होती. मार्च २०२० पर्यंत त्याने त्यांना नियमित अठरा हजाराचा हप्ता दिला, मात्र नंतर त्याने भाडे देणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे मोटरगाडीची मागणी केली होती, मात्र मोटरगाडी न देता तो पळून गेला होता. या मोटरगाडीची परस्पर विक्री करुन सुशांतची त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सुशांतविरुद्ध मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी मोटरगाडी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच दोन महिन्यानंतर पोलिसांनी सुशांतला अटक केली.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढा यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला- शिवेंद्रसिंहराजे भोसले

दुसऱ्या घटनेत बंदेनवाज नदाफ यांच्या तक्रारीवरून साकिनाका पोलिसांनी समीर कादरी याला अटक केली. बंदेनवाज हे अपंग असून ते पेटींगचे काम करतात. २०१६ त्यांनी एक मोटरगाडी खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज घेतले होते. त्यांना ६० महिन्यांसाठी दरमहा सुमारे पंधरा हजार रुपये हप्ता बँकेत भरावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी मोटरगाडी भाड्याने दिली होती. टाळेबंदीच्या काळात त्यांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मोटरगाडी विकण्याचा निर्णय घेतला. ही मोटरगाडी खरेदी करण्याचा बहाणा करून समीर मोटरगाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही. त्याने अशाच प्रकारे संजय घोडके यांचीही मोटरगाडी विक्रीसाठी नेली होती. त्यांनाही मोटरगाडी विक्रीतून  मिळालेले पैसे दिले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या दोघांनी मे महिन्यांत साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच समीरला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:44 IST
Next Story
मुंबई: गुगलवर ट्रॅव्हल्स कंपनीचा क्रमांक शोधणे पडले महागात