मुंबईत रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस बीट मार्शलचीच दुचाकी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कुर्ला (पश्चिम) येथील विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यातील बीट क्रमांक २ चे मार्शल दीपक खरटमल आणि पुजारी हे दोघे २० ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गस्तीवर होते. जयशंकर चौक, हलाव पूल येथे मोटारसायकल उभी करून ते माकडवाला कम्पाऊंड येथे गस्त घालण्यासाठी गेले होते. मात्र परतल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे दिसून आले. शोधाशोध केल्यानंतरही ती  न मिळाल्याने या दोघांनी पोलीस ठाण्यात येऊन दुचाकी (क्रमांक एमएच ०१-डब्ल्यू ए-७९०६) चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली.