scorecardresearch

वांद्रेतील माऊंट मेरी चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी; ‘या’ दहशतवादी संघटनेचा पोलिसांना ईमेल

माऊंट मेरी चर्चजवळ अनेक सेलिब्रिटी राहतात त्यामुळे या परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली आहे.

वांद्रेतील माऊंट मेरी चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी; ‘या’ दहशतवादी संघटनेचा पोलिसांना ईमेल
माऊंट मेरी चर्च (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईच्या वांद्रेमधील प्रसिद्ध अशा माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. काल (गुरुवारी) ईमेलद्वारे लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्यावतीने चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (३) नुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या धमकीच्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर या परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. ख्रिसमस सण नुकताच साजरा झालेला आहे. त्यानंतर ही धमकी प्राप्त झाल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. माऊंट मेरी चर्च हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असून याठिकाणी पर्यटक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

माऊंट मेरी चर्च हे वांद्रेमधील ज्या परिसरात स्थित आहे, त्याच परिसरात सेलिब्रिटी देखील राहतात. शाहरुख खान, सलमान खान याठिकाणी वास्तव्यास आहेत.

यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही मुंबई पोलिसांकडे मुंबईत बॉम्बस्फोट घडवले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. एका अज्ञात इसमाने फोनवरुन मुंबईतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईनवर सदर फोन आला होता. अंधेरीमधील इन्फिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात याठिकाणी काहीच आढळून आले नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या