लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या शनिवारी (२४ ऑगस्ट) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.
शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन विद्यार्थिनींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी बदलापूरमध्ये उमटले. संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत दहा तासांपेक्षा अधिक काळ मध्य रेल्वे मार्ग रोखून धरला होता. महाविकास आघाडीने बुधवारी विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा रद्द केली. बैठकीत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांसंदर्भात संताप व्यक्त करत शनिवारी राज्यव्यापी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते संजय राऊत आदी उपस्थित होते.