मुंबई : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील काँग्रेसमध्ये काही मोठे फेरबदल करण्याच्या दिल्लीस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. प्रदेश काँग्रेसच्या सध्याच्या रचनेत काही महत्त्वपूर्ण फेरबदल करून प्रमुख नेत्यांवर पक्षाच्या नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांचा कर्नाटक मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे ती जबाबदारी नव्या नेत्याकडे सोपविली जाणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सध्या चौथ्या स्थानावर आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रातही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे; परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अंतर्गत कलह उफाळून आला, पक्षात वरिष्ठ नेत्यांमध्येच एकोपा नाही, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे  काही नेत्यांकडे नव्या जबाबदाऱ्या  देण्याचे घाटत आहे.  

चेन्निथल्ला समितीच्या अहवालाचा आधार

चार महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातच हा वाद सुरू झाल्यामुळे पक्षश्रेष्ठींनाही त्याची दखल घ्यावी लागली. या वादात थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांची समजूत काढण्यासाठी प्रभारी एच.के. पाटील यांना पाठविण्यात आले होते. मात्र त्यानंतरही पक्षांतर्गत वाद धुमसत राहिल्याने सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करून अहवाल सादर करण्यासाठी केरळमधील पक्षाचे नेते रमेश चेन्निथल्ला यांची एकसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. आमदार व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अहवाल सादर केला; परंतु त्यानंतर रायपूर येथे पार पडलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीचे  अधिवेशन, त्यापाठोपाठ आलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुका यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते गुंतल्यामुळे महाराष्ट्रातील पक्षांतर्गत काही निर्णय घेणे प्रलंबित राहिले होते. मात्र आता  काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता असूून, त्याला चेन्निथल्ला समितीच्या अहवालाचा आधार असेल असे सांगण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movements change in the state congress possibility new responsibilities leaders ysh
First published on: 29-05-2023 at 00:49 IST