मुंबई : एका जोडप्याचे घरगुती सामान स्थलांतरादरम्यान खराब झाल्याबद्दल दक्षिण मुंबई ग्राहक न्यायालयाने लॉजिस्टिक्स कंपनी असलेल्या ‘मूव्हर्स अँड पॅकर्स’ला २.३० लाख रुपयांहून अधिकची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.सामान पॅक करणे, चढवणे , वाहतूक करणे आणि उतरवणे या प्रक्रियेदरम्यान वाजवी काळजी घेणे ही वाहतूक करणाऱ्याची कायदेशीर जबाबदारी आहे, असेही ग्राहक न्यायालयाने या प्रकरणी गेल्या महिन्यात दिलेल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने ‘अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स’ या कंपनीला वाहतुकीसाठी आकारलेली १,३३,७१७ रुपयांची संपूर्ण रक्कम, १ ऑगस्ट २०२३ पासून ६ टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचेही आदेश दिले. याव्यतिरिक्त, कंपनीला नुकसान भरपाईपोटी ५० हजार रुपये, मानसिक त्रास आणि गैरसोयीसाठीचे ५० हजार रुपये आणि कायदेशीर लढाईसाठी आलेल्या खर्चापोटी १० हजार रुपये ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश देखील दिले.

जोडप्याच्या तक्रारीनुसार, त्यांनी जुलै २०२३ मध्ये त्यांचे घरगुती सामान नवीन घरात नेण्यासाठी या कंपनीची सेवा घेतली होती. मात्र, सामान पोहोचवल्यावर अनेक वस्तूंचे पॅकेजिंग फाटलेले आढळले आणि लोखंडी कपाट व रेफ्रिजरेटरसारख्या वस्तू पावसाळ्यात इमारतीच्या तळमजल्यावरच ठेवण्यात आल्या होत्या. या निष्काळजीसाठी कंपनीने केवळ पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली होती. तथापि, सेवेतील त्रुटी आणि निष्काळजीपणाचा आरोप करून, जोडप्याने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत योग्य नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जोडप्याच्या तक्रारीची दखल घेतली आणि तक्रारदारांनी सादर केलेले दस्तावेज आणि छायाचित्रे त्यांच्या दाव्याला पुष्टी देतात. कंपनीने स्वतःच इ-मेलद्वारे झालेल्या पत्रव्यवहारात नुकसानाची कबुली दिली होती. त्याचप्रमाणे काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची तयारीही दर्शवली होती, असे निरीक्षण न्यायालयाने कंपनीला निकृष्ट सेवा दिल्याप्रकरणी दोषी ठरवताना नोंदवले.