या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू; बहुतांश निर्बंध शिथिल

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा आणि धार्मिक स्थळांपाठोपाठ चित्रपट आणि नाट्यगृहांचा पडदा २२ ऑक्टोबरपासून उघडण्यास राज्य शासनाने शनिवारी परवानगी दिली. ५० टक्के  प्रेक्षक क्षमतेत चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू करता येतील. काही अपवाद वगळता राज्यातील बहुतांश निर्बंध शिथिल झाल्याने अर्थचक्र  पुन्हा गतिमान होण्यास मदतच होईल, अशी शासनाची अपेक्षा आहे. 

शाळा व धार्मिकस्थळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून खुली होत असल्याने मनोरंजन क्षेत्रालाही दिलासा द्यावा या मागणीसाठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी भेट घेतली. निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर, खासदार संजय राऊत आदी या वेळी उपस्थित होते. या बैठकीनंतरच नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून खुली करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर के ले. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.  सुमारे दीड वर्षापासून मनोरंजन क्षेत्र ठप्प होते. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची धास्ती आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या याचा विचार करून सरकारने गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होणारी धार्मिकस्थळे, शाळा, सिने-नाट्यगृह बंदच ठेवण्याची भूमिका घेतली होती. शेजारील राज्यांमध्ये चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत. तसेच नाट्यगृहे बंद असल्याने मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक कलाकारांना अडचणीचा सामना करावा लागत होता. कामच नसल्याने कलाकार तसेच पडद्यामागील कामगारांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती.

 रंगभूमीदिनी म्हणजे ५ नोव्हेंबरला तरी नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची मागणी होती. करोनाचा संसर्ग कमी झाल्यानेच ऑक्टोबरअखेरीस मनोरंजन क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

लवकरच मार्गदर्शक तत्त्वे…

आरोग्यविषक नियम आणि सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अटींवरच मुख्यमंत्र्यांनी ही परवानगी दिली असून पुढील आठवड्यात याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर के ली जाणार आहेत. दसऱ्यानंतरच नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू होतील.

सर्वाधिक फटका : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका मनोरंजन क्षेत्राला बसला. हजारोंचा रोजगार गेला आणि उद्योगाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. पहिल्या लाटेनंतर नोव्हेंबरमध्ये ५० टक्के  प्रेक्षक क्षमतेत नाट्य आणि सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती.  दुसऱ्या लाटेत एप्रिलपासून मनोरंजन क्षेत्राला पुन्हा फटका बसला. नाट्यगृहे व चित्रपटगृहे बंद करण्यात आली.

नियमांची अट…

’नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरू करताना ५० टक्के   प्रेक्षक क्षमता तसेच करोनाबाबतच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.

’सोमवारी याबाबत बैठक होणार असून त्यात नाट्य तसेच सिनेमागृहांच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा होईल. त्यानंतरच नवीन नियमावली जाहीर के ली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movies and theaters open from october 22 most restrictions are relaxed akp
First published on: 26-09-2021 at 01:50 IST