शरद पवार यांच्याकडून पाठराखण, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेची बाजू मांडणाऱ्या चित्रपटात नथुरामाची भूमिका केल्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्याबद्दल नाराजीचा सूर लावल्यानंतर कलावंत म्हणून एखादी भूमिका करणे गैर नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली.

अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी

नथुराम गोडसेची बाजू मांडणाऱ्या चित्रपटात नथुरामाची भूमिका केल्याबद्दल राष्ट्रवादीचेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत घरचा अहेर दिला, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ वर्गाकडून सुरू आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तीकरण कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

‘भाजप कधीपासून गांधीवादी’

या सर्व वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अमोल कोल्हे यांच्या मदतीला धावून आले. एखाद्याने कलावंत म्हणून एखाद्या सिनेमात नाटकात एखाद्या पात्राची भूमिका केली तर तो कलाकार त्या पात्राच्या वैचारिक भूमिकेचे समर्थन करतो असा अर्थ होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात एखाद्याने औरंगजेबाची भूमिका केली अथवा रामायणावरील चित्रपटात एखाद्या कलावंतांनी रावणाची भूमिका केली, तर तो कलावंत औरंगजेब किंवा रावणाच्या वैचारिक भूमिकेचे समर्थन करतो असा होत नाही. त्याचप्रमाणे अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. कोल्हे हे गोडसेच्या विचारांचे समर्थन करतात असा अर्थ होत नाही, अशा शब्दांत पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली. तसेच या वादात भाजप टीका करत असल्याबद्दल बोलताना भाजप कधीपासून गांधीवादी झाला, असा टोला पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली असली तरी पक्षाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र कोल्हे यांनी गोडसे यांची भूमिका करण्यास विरोध दर्शविला आहे.

‘बाऊ करण्याची आवश्यकता नाही’

हा सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते नंतर आले. त्यामुळे नोटीस काढायची आणि या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करून अमोल कोल्हे घराघरात पोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp amol kolhe from the role of nathuram godse criticism of ncp leaders akp
First published on: 22-01-2022 at 00:17 IST