भाजप तसा शिस्तप्रिय पक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यकाळात भाजपमध्ये विरोधी सूर आवळण्याची कोणाची टाप नसते. कोणी एखाद्याने प्रयत्न केलाच तर त्याचा ‘एकनाथ खडसे’ केला जातो, अशी राज्य भाजपमध्ये कुजबूज असते. कारण नेतृत्वाने नियुक्त केलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेल्यानेच खडसे हे कायमचे घरी गेले. ‘मला पक्षात घ्या’, असे आर्जव करूनही भाजपमध्ये त्यांचा फेरप्रवेश झाला नाही. पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा कोणी फारसा प्रयत्न करीत नाही, पण केलाच तर त्याची काही खैर नसते. एवढी मोदी-शहा दुकलीची पक्षावर दहशत आहे. असे असले तरी अधूनमधून पक्षातील काही नेतेमंडळी राज्य नेतृत्वाच्या विरोधात अस्वस्थता व्यक्त करतात.
मध्य प्रदेशमध्ये तीन वर्षांपूर्वी सत्ता मिळताच भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना डावलून मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची निवड केली. खरे तर चौहान यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा होता. पण दिल्लीतील नेतृत्वाने नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठीच मोहन यादव यांना संधी दिली. तसेही मोहन यादव हे तुलनेत नवखे होते. शिवराजसिंह चौहान यांची दिल्लीत रवानगी करण्यात आली. मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला. आणीबाणीनंतर जनता राजवटीत कैलास जोशी, वीरेंद्रसिंह सकलेचा आणि सुंदरलाल पटवा या तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते.
१९९० मध्ये मध्य प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले आणि सुंदरलाल पटवा यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यावर केंद्रातील काँग्रेस सरकारने भाजपशासित राज्ये बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर पुढे दहा वर्षे दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तेत होते. २००३ पासून २०१८ पर्यंत राज्यात भाजपची एकहाती पकड होती. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला व कमलनाथ मुख्यमंत्री झाले. पण भाजपने तोडफोड करून काँग्रेस सरकार पाडले. शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. २०२३च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्याचे भाजपसमोर कडवे आव्हान होते. पण ‘लाडली बेहना’ या लोकप्रिय घोषणेने सारे चित्रच पालटले. त्याचे सारे श्रेय शिवराजसिंह चौहान यांना जाते.
शिवराजसिंह चौहान का संतापले?
केंद्रीय कृषिमंत्री तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उर्फ मामाजी हे शांत, संयमी नेते म्हणून ओळखले जातात. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या चौहान यांनी पक्षांतर्गत घडामोडींबाबत कधी वादग्रस्त विधाने वा टीकाटिप्पणी केल्याची उदाहरणे नाहीत. सतत हसतमुख असलेले मामाजी हा मध्य प्रदेश भाजपचा मुख्य चेहरा आहे. भाजपसाठी परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला होता. पण शिवराजसिंह चौहान यांनी कधी उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही किंवा नेतृत्वावर खापर फोडले नाही. मुख्यमंत्रीपद नाकारले तरी पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी हे महत्त्वाचे खाते सोपवून शिवराजसिंह चौहान यांचे एक प्रकारे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी ते फटकून वागतात, असा तक्रारींचा सूर असतो. शिवराजसिंह चौहान दिल्लीत स्थिरावले होते. त्यांनी कधीही राज्याच्या कारभारावर भाष्य केले नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून चौहान यांची खदखद बाहेर पडू लागलेली दिसते.
चौहान यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघातील १२ आदिवासी कुटुंबीयांची घरे वन खात्याने हटविली. वन खात्याच्या जमिनीवरील हे अतिक्रमण असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा वन विभागाचा दावा आहे. पण या कारवाईने शिवराजसिंह चौहान प्रचंड संतप्त झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान केलेल्यांना का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल त्यांनी मध्य प्रदेश सरकारला केला. एवढे बोलून चौहान थांबले नाहीत, तर ‘या मतांमुळेच भाजपला विजय मिळाला आणि मोहनजी मुख्यमंत्री झाले’, असे खडे बोल सुनावले. शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांनाच थेट लक्ष्य केले. आदिवासी कुटुंबांवर कारवाई करणारे वन खाते हे मुख्यमंत्री यादव यांच्याकडेच आहे. प्रश्न फक्त १२ कुटुंबीयांवरील कारवाईचा होता, पण त्या माध्यमातून चौहान यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील संतापाला वाट करून दिली.
चौहान यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांना ‘लाडली बेहना’ योजनेवरून चिमटा काढला होता. महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरण होते व सत्ता कायम राखणे कठीण वाटत होते. तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेल्या चौहान यांनी महिलांना दरमहा १००० रुपये अनुदान देणारी ‘लाडली बेहना’ योजना लागू केली. ही ‘लाडली बेहना’ योजना महागडी ठरू लागल्याची टीका मुख्यमंत्री यादव यांनी करून चौहान यांना आर्थिक बोजा वाढल्याबद्दल दोष दिला. ‘बहिणींना राग आला तर कोणाची खैर नाही, हे सर्वांना माहीत आहे. यामुळेच कोणतेही सरकार येवो, बहिणींसाठीची योजना सुरूच ठेवावी लागेल’, असे प्रत्युत्तर चौहान यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मध्य प्रदेशातील मूग उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही चौहान व यादव या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नव्हती.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधराराजे, छत्तीसगडमध्ये रमणसिंह या प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली. या तीन राज्यांबरोबरच ओदिशा, दिल्ली, हरियाणा या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातूनच टीका केली जाते. भाजपने नेतृत्वाची नवीन फळी पुढे आणली असली तरी राजकीयदृष्ट्या हे नेते अजून स्थिरावलेले नाहीत. शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या वादापासून दूर राहणाऱ्या नेत्याचा कोप होतो व ‘तुम्ही मुख्यमंत्री कशामुळे झालात?’ हे सुनावतो, तेव्हा पक्षांतर्गत सारे काही आलबेल नाही, हेच स्पष्ट होते.
हा भाजपमधील बदल?
राजस्थानमध्ये किरोडीलाल मीना किंवा के. के. बैष्णोई, हरियाणात अनिल विज या भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली. आता तर केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेले आहेत. मणिपूरमध्ये माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या विरोधात आमदारांनी बंड पुकारले होते. मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यानेच बिरेन सिंह यांना अखेरीस बदलण्यात आले. नवीन नेत्यांना भाजपकडून पुढे आणले जात आहे. प्रस्थापित नेत्यांना दूर करीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची खेळी योग्यच. पण नव्या नेत्यांना अद्याप जम बसविता आलेला नाही. मोहन यादव हे राज्यातील भाजप नेत्यांशी फटकून वागतात, असा त्यांच्यावर आरोप होतो. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या विरोधात पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे अन्य नेत्यांशी जमत नाही. काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये कोणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम राबवत नाहीत किंवा विरोधात जाहीरपणे शक्तिप्रदर्शन केले जात नाही. शिवराज चौहान यांनी वादाला तोंड फोडले आहे. भाजपमधील हा एक बदलच आहे.
santosh.pradhan@expressindia.com
