BMC Election 2026 Voting : राज्यात मुंबई, ठाणे, पुण्यासह २९ महानगरपालिकांसाठी आज (दि.२५) मतदान पार पडत आहे. आज सकाळपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. मात्र, राज्यातील काही मतदार केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एवढंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मतदानानंतर बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबईतील दहिसरमध्ये देखील एक गोंधळाची घटना समोर आली आहे. पोलीस आणि शिवसेना ठाकरे सेनेचे ‘भगवा गार्ड’ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ठिकाणी काहीवेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईत काही ठिकाणी घडलेल्या घटनांवरून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
‘शहा सेनेचे लोक भाजपाच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं’, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊतांनी काय म्हटलं?
“‘दुबार किंवा बोगस मतदार पकडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांना ठेचून काढू’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, शिवसेना-मनसेच्या ‘भगवा गार्ड’वर त्यांचा रोख दिसतोय. मुख्यमंत्री साहेब, हरामचा पैसा वाटपावरून सध्या ‘शहा सेनेचे’लोक भाजपाच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष्य द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत. तूर्त इतकंच! जय महाराष्ट्र!”, असं खासदार संजय राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मतदान करून आल्यानंतर बोटावरील शाईवरून राज ठाकरे संतापले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केलं आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले. फ्रॉड निवडणुकांतून सत्तेत येण्यास सत्ता म्हणत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच, बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. मतदान करून आल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, “सरकार आणि प्रशासनाकडून निवडणूक जिंकण्याकरता वाट्टेल ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला दुबार मतदारांचा विषय आला. तेव्हा सरकार म्हणालं की यात आमचा काहीही संबंध नाही. पण तरीही मुंबईत १० लाख दुबार मतदार जाहीर झाले. आता ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट नसल्याने मतदारांनी दाबलेलं बटन बरोबर चिन्हावर गेलंय का हेच दिसत नाहीय. त्यानंतर सरकारने आता पाडू नावाचं यंत्र मतमोजणीसाठी आणलंय.”
ते पुढे म्हणाले, “निवडणुका कशापद्धतीने जिंकायच्या हे सरकारने ठरवलं आहे. पाडू मशीन हे कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. आम्ही पत्र पाठवूनही आम्हाला याबाबत उत्तर दिलेलं नाही. आज तर अजून वेगळं. बोटावर जी शाई लावली जायची, त्याजागी आता नवीन पेन आणलाय. म्हणजे मतदार मतदान करून बाहेर आल्यानंतर सॅनिटायजरने ही शाई लगेच पुसली जातेय.”
