मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील जुहू लेनकडील बर्फीवाला रोडजवळील सुमारे साडेचार हजार चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या महत्त्वाच्या भूखंडाच्या व्यवहारात तब्बल १२०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. महापालिकेच्या ताब्यातील या भूखंडाच्या घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. येत्या काळात दर आठवड्याला मुंबई महापालिकेतील विविध घोटाळे बाहेर काढले जातील, असे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्ष व खासदार वर्षा गायकवाड यांनी अंधेरीतील जुहू परिसरातील मनपा भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला. यावेळी त्या म्हणाल्या की, अंधेरी पश्चिम येथील बर्फीवाला लेनवर सीटीएस क्रमांक २०७ या ठिकाणी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत होती. त्या ठिकाणी ५५ घरे होती, मात्र भूखंडाचा अनधिकृतरित्या ताबा घेऊन एसआरए योजना घोषित करण्यात आली आणि ७५ घरे उभारण्यात आली.

परंतु विकासक एसआरए योजना पूर्ण करू शकला नाही. त्यानंतर मनपाने पुन्हा त्या भूखंडावर सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेअंतर्गत घरे बांधण्यास सुरुवात केली. मात्र, एसआरए योजनेतून भूखंड परत घेतला गेला नाही, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभाग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून अंधेरी (गाव) येथील सुरू असलेल्या बांधकामांना त्वरित स्थगिती देण्याची आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.

राजीव गांधी भवन येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, एसआरए विभागातही भ्रष्टाचाराचा सुळसुळाट आहे. विभागातील अधिकारी व सत्ताधारी पक्षांचे नेते संगनमताने मुंबईची लूट करीत आहेत आणि गोरगरीब झोपडपट्टीतील रहिवाशांवर अन्याय करीत आहेत. जुहू लेन / बर्फीवाला रोडजवळील ४४९७.१० चौ. मी. क्षेत्रफळ असलेल्या महत्त्वाच्या भूखंडावर एसआरए आणि आश्रय योजना अशा दोन परस्परविरोधी पुनर्विकास योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्याची माजी नगरसेवक मेहर हैदर यांनी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु अद्यापपर्यंत महापालिकेने उत्तर दिलेले नाही. आश्रय योजनेअंतर्गत अद्याप काम सुरू झालेले नसताना त्यांना दहा कोटी रुपये का दिले अशी विचारणा अश्रफ आझमी यांनी २७ जून रोजी पत्र पाठवून केली होती. यावरही पालिका प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी गायकवाड यांनी केली.