मुंबई : शिक्षक भरती, आरोग्य भरती आणि म्हाडा भरती परीक्षा गैरप्रकाराची पुणे सायबर पोलिसांबरोबरच आता सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी) समांतर चौकशी करणार आहे. मात्र त्याच वेळी म्हाडा ऑनलाइन परीक्षा  गैरप्रकाराच्या चौकशीचे काय झाले, असा प्रश्न एमपीएससी समन्वय समितीने केला आहे. ऑनलाइन परीक्षेतील ६३ संशयित परीक्षार्थीविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तीन महिन्यांनंतरही ६३ जणांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. तात्काळ हा अहवाल सादर करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

म्हाडातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी डिसेंबरमध्ये ऑफलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र पेपरफुटीच्या काही तास आधी अचानक परीक्षा रद्द करण्यात आली आणि त्यानंतर म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार समोर आला. यानंतर म्हाडाने टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये ऑनलाइन परीक्षा घेतली, मात्र या परीक्षेतही गैरप्रकार झाले. परीक्षेदरम्यान काही बोगस परीक्षार्थी आढळले. परीक्षा नसलेल्या दिवशी औरंगाबाद केंद्रात संगणकीय प्रणालीत छेडछाड करण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर समितीने केलेल्या सखोल चौकशीच गैरप्रकाराची व्याप्ती वाढली.

समितीने म्हाडाला ३६ बोगस उमेदवारांची नावे दिली. या तक्रारीनुसार टीसीएसमार्फत चौकशी केली असता औरंगाबादच्या प्रकरणात तथ्य आढळले. तसेच ३६ नव्हे तर एकूण ६३ संशयित उमेदवार आढळले.  टीसीएसच्या अहवालानुसार काही परीक्षार्थीची छायाचित्रे, बोटांचे ठसे जुळत नसल्याचे उघड झाले आहे. तर काहींच्या परीक्षा केंद्रातील हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. या ६३ परीक्षार्थीचा निकाल राखून ठेवत मेमध्ये म्हाडास्तरावर चौकशी सुरू करण्यात आली. मात्र आता ऑगस्ट उजाडला तरी म्हाडाचा चौकशी अहवाल सादर झालेला नाही. म्हाडाला चौकशीसाठी इतका वेळ का लागला, असा सवाल एमपीएससी समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी उपस्थित केले.

मेपासून ६३ जणांची चौकशी सुरू आहे. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही चित्रण तपासणे, त्यांच्या परीक्षा केंद्रातील हालचाली तपासणे यांसह अन्य प्रकारची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशीला वेळ लागत असून सध्या चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात आहे. अहवाल सादर झाल्यानंतर दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल.

– राजकुमार सागर, सचिव, म्हाडा