मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी झालेल्या चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली होती.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी २२ मार्च रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मिळवून त्यांचा स्वतंत्र संच तयार करून तो अनधिकृत व्यक्तींपर्यंत पोहोचला. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेतील गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या तक्रारीवरून २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत २६ ऑगस्ट रोजी सहा जणांना अटक केली.
अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीचे सहायक विभाग अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंढवे आणि सहायक विभाग अधिकारी गोपाळ मराठे यांचा समावेश आहे. याशिवाय, नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, कथित सूत्रधार अमृत पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव पाटील यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), महाराष्ट्र स्पर्धात्मक परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायदा, २०२४, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक, विश्वासघात, गुन्हेगारी कट आणि लोकसेवकांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा यात समावेश आहे.
अटक केलेल्या सहाही जणांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रश्नपत्रिकेतील गोपनीय माहिती आरोपींपर्यंत नेमकी कशी पोहोचली, ती कोणाकोणाला वितरित करण्यात आली आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या सहा जणांवरील आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झालेले नाहीत.
