मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अलीकडील नऊ परीक्षांमधील गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी आयोगाने या प्रकरणाशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी व अन्य व्यक्ती तसेच संबंधित नोंदणीकृत संस्थांना निवेदने पाठवण्याचे आवाहन चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

ही निवेदने शपथपत्राच्या स्वरूपात मराठी किंवा इंग्रजी भाषेत आयोगाकडे सादर करावीत. १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर निवेदने सादर करता येतील. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठवायची आहे.

याप्रकरणी तक्रारी दाखल करण्यासाठी आवश्यक माहिती व मदतीकरिता चौकशी आयोग कार्यालयाचा ०२२-२०८६७६७७ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. चौकशी आयोगाच्या या जाहीर सूचनेला प्रतिसाद म्हणून दाखल करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे गोपनीय ठेवली जातील. निवेदनांची छाननी करून संबंधित व्यक्तीला आयोगासमोर साक्षीदार म्हणून तपासायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाकडे राहणार आहे.

mpsc-exam-malpractice-inquiry-commission-tukaram-mundhe-notice
१६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश: तक्रारी आणि कागदपत्रांची प्रत आयोगाच्या अधिकृत ई-मेलवर पाठवण्याचे तुकाराम मुंढेंचे आवाहन.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पुण्यामध्ये परीक्षार्थींचे आंदोलन झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे.

निवेदन या परीक्षा संदर्भात असावे :

औषध निरीक्षक परीक्षा गट- ब २०२५, महाराष्ट्र गट -ब, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट -ब, सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट -क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट -क, सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४, अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ या नऊ परीक्षांसंदर्भात निवेदने पाठवता येणार आहेत.