मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ही सवलत केवळ एमपीएससीपुरती मर्यादित ठेवलेली नाही. राज्यातील अन्य भरती यंत्रणांमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या सरकारी भरती परीक्षांनाही ही सवलत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध विभागांतील सरळसेवा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही दिलासा मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी ही सवलत लागू राहणार आहे.

एमपीएससीच्या भरती प्रक्रियेतील विलंब, परीक्षा आणि नियुक्त्यांमधील अनिश्चितता यामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत असल्याचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. या पार्श्वभूमीवर भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. समितीच्या शिफारसीनंतर तातडीने सामान्य प्रशासन विभागाने ५ नोव्हेंबरला याबाबत निर्णय घेतला आहे, हे विशेष!

या निर्णयानुसार १ जानेवारी २०२६ पासून ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या ज्या भरती जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा एकही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठीही एक वर्षाची वयोमर्यादा सवलत लागू असेल. या सवलतीमुळे नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची एकवेळची विशेष संधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही एमपीएससीने करायची आहे.

याशिवाय, ५ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत एमपीएससीमार्फत नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या भरती जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनाही ही सवलत मिळेल. एमपीएससीव्यतिरिक्त अन्य भरती यंत्रणांच्या परीक्षांनाही याच तरतुदी लागू राहतील.

कमाल वयोमर्यादेपेक्षा वेगळी वयोमर्यादा काही पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये निश्चित केली असेल, तरी अशा पदांनाही एक वर्षाची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे केवळ सर्वसाधारण वयोमर्यादा असलेल्या पदांपुरती ही तरतूद मर्यादित नाही. मात्र, ही सवलत कायमस्वरूपी नसून एकवेळची विशेष सवलत आहे. १ जानेवारी २०२८ पासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार असलेली मूळ कमाल वयोमर्यादाच लागू राहणार आहे.

तातडीने निर्णय

एमपीएससीच्या परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी स्थापन केलेल्या व्ही. राधा समितीने ५ नोव्हेंबर रोजी अंतरिम अहवाल सादर केला होता. या अहवालात सर्व भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचबरोबर एमपीएससीच्या गट-क संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शिफारसही करण्यात आली होती. मात्र, आता सरकारने वयोमर्यादेतील सवलतीबाबत स्वतंत्र शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी निश्चित केली आहे. अर्थात कोणत्या प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा नेमकी किती होईल, हे संबंधित पदाच्या मूळ वयोमर्यादेनुसार ठरेल.