मुंबई : राज्यातील शासकीय भरती परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी व परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींना आळा घालून भरती अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल शासनाला सादर केला. या अहवालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील पदसंख्या १६ हजारांहून अधिक करण्याबरोबरच राज्यातील सर्व शासकीय भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एकदाच एक वर्षाची सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना गट-क परीक्षेत संधी मिळावी, यासाठी अर्जप्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्याची सूचनाही समितीने केली आहे.

गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी सुमारे १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या या परीक्षेसाठी पाच हजारांहून अधिक पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, विविध शासकीय विभागांकडून आणखी ११ हजारांहून अधिक पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. ही अतिरिक्त पदे शुद्धिपत्रकाद्वारे परीक्षेत समाविष्ट करून एकूण पदसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यामुळे या परीक्षेतील उमेदवारांना अधिक पदांसाठी स्पर्धा करण्याची संधी मिळू शकते.

भरती प्रक्रियेतील विलंब व विविध कारणांमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांच्या मागण्यांचा विचार करून कमाल वयोमर्यादेत एक वेळची विशेष सवलत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत १ जानेवारी २०२६ नंतर प्रसिद्ध झालेल्या व ज्यांची निवडप्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, अशा सर्व भरती जाहिरातींसाठी तसेच ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी लागू करण्याची सूचना आहे. मात्र, ही समितीची शिफारस असून तिच्या अंमलबजावणीसाठी शासनाचा निर्णय व संबंधित आदेश आवश्यक असतील.

गट-क पूर्व परीक्षेची सध्याची परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम कायम ठेवण्याची शिफारस समितीने केली आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गांच्या मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकर जाहीर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वी सुरू असलेली प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया रद्द करून सुरक्षित पद्धतीने नव्याने प्रश्नपत्रिका तयार करावी, असे समितीने सुचविले आहे.

प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, साठवणूक व वाहतूक यासाठी कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवणे, परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवणे, तसेच भ्रमणध्वनी व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सिग्नल जॅमर बसविणे अशा उपाययोजनांचाही अहवालात समावेश आहे. परीक्षा आयोजनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.

राज्यातील शासकीय व स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी, गैरप्रकार तसेच अनुचित साधनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी व उमेदवारांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीला भरती परीक्षांच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेऊन सुधारणा सुचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नपद्धती पुन्हा लागू करण्याची मागणी उमेदवारांकडून जोर धरत आहे. राज्यसेवा, कृषी सेवा, अन्नसुरक्षा अधिकारी व अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांसाठी ही मागणी करण्यात आली आहे. सध्या लागू असलेल्या वर्णनात्मक पद्धतीऐवजी पुन्हा बहुपर्यायी प्रश्नांची पद्धत आणण्याबाबत उच्चस्तरीय समितीने उमेदवारांच्या सूचना व मते जाणून घेतली आहेत. मात्र, वस्तुनिष्ठ की वर्णनात्मक परीक्षा पद्धती कायम ठेवायची, याबाबत समितीने अंतरिम अहवालात स्पष्ट शिफारस समोर आलेली नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या निर्णयासाठी उमेदवारांना अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.