मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजात अनेक त्रुटी आहेत. भरती प्रक्रियेत अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भरती प्रक्रियेदरम्यान पेपर फुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एमपीएससीच्या विरोधात राज्यात जन आंदोलन उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, खासदार डॉ अमोल कोल्हे, निलेश लंके, माजी खासदार फौजिया खान, माजी आमदार . अशोक पवार आदी उपस्थित होते.

एमपीएससीच्या कारभारात अनेक त्रुटी आहेत. राज्यातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करतात. वेळ खर्ची घालून प्रामाणिकपणे अभ्यास करतात. पण, गैरकारभारामुळे त्यांच्या भवितव्याशी खेळ होतो. त्यामुळे विद्यार्थींच्या हितासाठी एमपीएससी विरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

एकेकाळी मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख नोकऱ्या देणारे, हाताला काम देणारे राज्य अशी होती. देशभरातून लोकं नोकऱ्यांसाठी राज्यात येत होते. आता हातातील नोकऱ्या काढून घेणारे राज्य, अशी ओळख निर्माण झाली आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती घसरली असून, राज्याची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. सरकारकडे पैसा नाही. दुष्काळ, कर्जमाफी, वाढत्या महागाई बद्दल सरकार गंभीर नाही. ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. स्मार्ट मीटरच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची चोरी केली जात आहे. भविष्यात स्मार्ट मीटर विरोधाही आवाज उठवला जाईल. अभिव्यक्ती स्वातत्र्य घटनात्मक अधिकार असतानाही सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे झेन झी अथवा समाज माध्यमांवर सक्रीय असलेल्यांवर गुन्हा दाखल झाला तर राष्ट्रवादीची कायदेविषयक टीम त्यांना मदत करेल, असेही आव्हाड म्हणाले.

शरद पवार, रोहित पवार बैठकीला अनुपस्थितीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एका दौऱ्यावर जाणार असल्यामुळे बैठकीला उपस्थितीत नव्हते. तर रोहित पवार पूर्वनियोजित परदेश दौऱ्यावर असल्यामुळे तेही बैठकीला उपस्थितीत नव्हते.

दहा नवे प्रवक्ते

मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, फैजल मिर्झा, महेबूब शेख, प्रवीण कुंटे ,प्रशांत सोनबा वीरकर, . हेमाताई पिंपळे, डॉ. चंद्रकांत बारेला यांचा प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे.