मुंबईः पेपरफुटी प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) सचिवदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. तर विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने अध्यपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांना तूर्त रजेवर पाठवून पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात सोमवारी सरकारला यश आले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे.

आपण संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करीत भिमनवार रजेवर गेले आहेत.

लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने न्या. दिलीप भोसले यांची समिती गठीत केली असून त्यांना चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. न्यायालयीन चौकशी समितीच्या स्थापनेची सरकारने घोषणा केली असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर चौकशी समितीची अधिसूचना निर्गमित होणार असून त्यानंतर समितीचे कामकाज सुरू होईल.

समितीचा अहवाल आणि त्यावरील सरकारचा निर्णय होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन भिमनवार यांच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आयोगात ज्येष्ठतेनुसार अभय वाघ, सतीश देशपांडे, राजीव निवतकर,दिलीप पाटील- भुजबळ आणि सतीश वाघोले या सदस्य आहेत.

मात्र वाघ यांच्यावरही आरोप झाल्यामुळे देशपांडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला जाण्याची शक्यता असून त्याबाबत राज्यपाल कोणता निर्णय घेतात याकडे आयोगाचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आल्यानंतर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.