मुंबई : माझ्या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी गणेश देवरे हे कुठे राहतात याची मला कल्पना असण्याची गरज नाही. देवरे जर पेपरफुटीप्रकरणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. या परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जातात. त्यामुळे पेपरफुटीचा आणि माझ्या कार्यालयाचा काही संबंध नाही, असा दावा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला आहे.

‘पेपरफुटीचे धागेदोरे मंत्री कार्यालयापर्यंत’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’ने ४ सप्टेबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना गणेश देवरे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘मी आरोपीच्या घरी भाड्याने राहातो, याचा अर्थ मी पेपरफुटीप्रकरणी दोषी आहे असा होत नाही. या प्रकरणाता माझी कोणतीही चौकशी झालेली नाही आणि मी कुठेही लपून राहिलेलो नाही. प्रसारमाध्यमांकडून आपली विनाकारण बदनामी केली जात आहे.’ तर या संदर्भात मंत्री झिरवाळ यांनी पुढे सांगितले की, ‘देवरे हे गेल्या वर्षभरापासून माझ्या कार्यालयात कार्यरत आहेत आणि त्यांचे काम चांगले आहे. पण, ते कुठे राहतात याची मला कल्पना नाही.’

औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचे विशेेष चौकशी पथक स्थापन केले आहे. त्याचे प्रमुख मंगेश देसाई आहेत. ज्या लॅपटॉपव्दारे प्रश्नसंच परिक्षार्थींना पाठवण्यात आले, तो फोडून आरोपींनी वाशी खाडीत फेकून दिला होता. तो लॅपटॉप पोलिसांनी शोधला आहे. अटक झालेल्या सात आरोपींपैकी पाच नंदूरबारचे असून ते एकमेकांचे नातलग आहेत. या पेपरफुटीची व्याप्ती नंदुरबार पुरती मर्यादीत असल्याचा पोलिसांचा तपास सांगतो आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांची पेपरफुटीप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

मंत्री कार्यालयाचा ढिसाळपणा –

नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात फेब्रुवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. त्यामध्ये मंत्री कार्यालयातील लिपिक राजू ढेरंग याला लाच स्वीकारताना अटक झाली होती. तेव्हा मंत्री झिरवाळ यांनी सदर कर्मचारी हा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कर्मचारी असल्याचा सांगत हात झटकले होते. हा प्रकार घडल्यानंतरही मंत्री झिरवाळ यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पडताळणी केलेली नाही. खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी वगळता २ विशेष कार्य अधिकारी, २ लिपीक, ३ शिपाई हे उसनवारी पद्धतीने आजही झिरवाळांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. देवरे यांची चर्चा सुरु झाल्यावर त्यांची मूळ विभागात पाठवणी केल्याचे सांगून झिरवाळ यांनी पुन्हा यातून अंग काढून घेतले आहे.