मुंबई: राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी च्या पेपरफुटी प्रकरणात आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार  यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन प्रकरणात लक्ष घातले असून त्यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती केली.

 एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आयोगाचे अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत पुण्यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गेल्या आठ दिवसापासून बेमुदत आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार  विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदोलनातला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी आंदोलन स्थळी जात विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणाचेही पाय धराला आपण तयार असल्याची भूमिका मांडली होती. तसेच या वादावर लवकर तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुण्यातील आंदोलनाबाबत चर्चा करून लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी स्वतःही माहिती दिली.

५ ऑक्टोबर ला आपण पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा तुमचे म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असे आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर आपली मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत  MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.