मुंबई : राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शनक, प्रभावी आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ करण्याकरिता सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरिय गटाला आतापर्यंत ३० हजार सूचना प्राप्त झाल्या असून आतापर्यंत दीड हजार विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आणि परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती उच्चस्तरिय गटाच्या अध्यक्ष आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली.

भरती परीक्षा सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरिय गटाने मंगळवारी कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला. आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरनंतर कोकण विभागातील उमेदवारांशी संवाद साधण्यात आला.

यावेळी उच्चस्तरीय समितीचे सदस्य आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), आयआयटी- मुंबईच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते. प्रत्येक विभागात उमेदवारांकडून वेगवेगळे प्रश्न आणि सूचना मांडण्यात आल्याचे व्ही. राधा यांनी सांगितले. नाशिक विभागातील उमेदवारांशी बुधवारी संवाद साधण्यात येणार आहे.

भरती परीक्षा सुधारण्याकरिता केवळ शिफारशीच केल्या जाणार नसून अडचणींच्या मुळाशी जाऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थ्यांच्या संवादातून प्रत्येक विभागाची स्वतंत्र पार्श्वभूमी आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी समोर आल्या आहेत. परीक्षानिहाय तसेच विभागनिहाय समस्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जाईल. या संवादातून मिळालेली माहिती आणि अनुभव अहवाल तयार करताना महत्त्वाचे ठरणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगासह अन्य राज्यांमधील भरती प्रक्रियेचाही अभ्यास करण्यात येईल. संबंधित विभागांच्या सचिवांशी चर्चा करून समस्यांची कारणे निश्चित केली जातील, असे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले.

‘एक पद, एक परीक्षा’ची मागणी

उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील दिरंगाई टाळण्यापासून परीक्षा पद्धतीतील बदलांपर्यंत अनेक सूचना केल्या. एक पद, एक परीक्षा, गट-क संवर्गातील सर्व पदांची भरती एकत्र करणे, दोन परीक्षांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, प्रलंबित परीक्षा तातडीने घेणे, पूर्व आणि मुख्य परीक्षा अशी पद्धत लागू करणे, तसेच वरिष्ठ पदानुसार निकाल जाहीर करणे, अशा मागण्या उमेदवारांनी मांडल्या. याशिवाय परीक्षेची माहिती वेळेत मिळावी, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्यावी, परीक्षा पद्धतीत बदल करण्यापूर्वी पूर्वकल्पना द्यावी, प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा विचार करावा, वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असावी, अशा सूचना करण्यात आल्या.

नोंदणी, शुल्क आणि उत्तरतालिकेबाबतही सूचना

प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र नोंदणी आणि शुल्क आकारण्याऐवजी एकदाच नोंदणी आणि शुल्क आकारणी करावी, अशीही सूचना उमेदवारांनी केली. प्रश्नपत्रिकेचा दर्जा, उत्तरतालिका आणि उत्तरपत्रिकांची तपासणी अधिक पारदर्शक करण्याची मागणीही करण्यात आली. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींना वयोमर्यादेत सवलत देण्याची सूचनाही उच्चस्तरिय गटासमोर मांडण्यात आली.