सहा वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर मुहूर्त; परीक्षार्थी-परीक्षा केंद्रांचा उच्चांक

पुणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेली महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० साठी परीक्षार्थी आणि परीक्षा केंद्रांचा उच्चांक नोंदवला गेला आहे. सुमारे ३ लाख ८२ हजार परीक्षार्थी असून, १ हजार १६४ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  (एमपीएससी) संयुक्त पूर्वपरीक्षा एप्रिल २०२० मध्ये होणार होती. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. आता ती होत आहे. करोना परिस्थितीमुळे परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली असून, प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आयोगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सुमारे साडेतीन लाख उमेदवारांची नोंदणी असते, तर सुमारे एक हजार केंद्रांवर परीक्षा घेतली जाते. मात्र संयुक्त पूर्वपरीक्षा २०२० साठी झालेली उमेदवारांची नोंदणी आणि परीक्षा केंद्रे सर्वाधिक आहेत.

आंदोलनानंतर… 

करोनासह आरक्षणाच्या मुद्द्यासह वेगवेगळ्या कारणांनी एकूण सहा वेळा ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. परीक्षा सतत लांबणीवर पडत असल्याने संतप्त उमेदवारांनी आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी (४ सप्टेंबर) राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर आयोगामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.

सर्वाधिक नोंदणी…

या परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे, तर १ हजार १६४ परीक्षा केंद्रे आहेत. सर्वाधिक सुमारे ४० हजार उमेदवार आणि सुमारे ११० परीक्षा केंद्रे पुणे जिल्ह्यात आहेत.