मुंबई : दादरमधील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा ब्रिटिशकालीन टिळक उड्डाणपूल पाडून येथे नव्या पद्धतीने ‘केबल स्टेड’ पूल उभारण्याच्या प्रकल्पाला आता गती देण्यात येत आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपेंट कॉर्पोरेशनने (एमआरआयडीसी) रेल्वे हद्दीतील कामांना मंजुरी मिळावी यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच जुन्या पुलावरील उपयोगिता वाहिन्या हटवण्याची कामेही सुरू करण्यात आली आहेत.

काही वर्षांपूर्वी अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व पुलांची आयआयटीमार्फत संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. आयआयटीने केलेल्या शिफारसीनुसार ११ पुलांच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही कामे मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने ‘एमआरआयडीसी’ करणार आहे. त्यात टिळक पुलाचाही समावेश असून जुना उड्डाणपूल पाडून त्याच्या जागी नवीन केबल स्टेड पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. दादर येथील टिळक उड्डाणपूल पूर्व व पश्चिमेला जोडणारा आहे. या पुलावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरू असते. दादर, परेल भागांतील वाहतुकीची भिस्त या पुलावरच आहे. ठाण्याच्या दिशेला जाण्यासाठीही या पुलाचा वापर होतो.  एमआरआयडीसीने या पुलाचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुलाच्या हद्दीतील मोठय़ा वाहिन्या, विविध सेवा उपयोगिता कंपन्यांच्या केबल काढण्याचे काम सुरू आहे. तसेच पूल बांधणीला सुरुवात करता यावी यासाठी रेल्वेच्या हद्दीतील प्राथमिक कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. केबल स्टेड पुलाचे दोन खांब रेल्वेच्या हद्दीत येणार असून त्यामुळे विविध कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे परवानगी मागितली आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूला साधारण पाच ते सहा दुकाने असून यापैकी दोन दुकाने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. तर उर्वरित दुकाने स्थलांतरित करण्यासाठी मुंबई महापालिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रथम केबल स्टेड पुलाची उभारणी करूनच जुना पूल पाडण्यात येणार आहे. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला डिसेंबर २०२२ किंवा जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. नवीन केबल स्टेड टिळक उड्डाणपूल उभारण्यासाठी ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. 

नवा टिळक

पूल असा..

* लांबी ६६३ मीटर

* एकूण सहा मार्गिका

* संपूर्णपणे केबलच्या आधारे उभा पूल.

* कमीत कमी खांबांचा वापर.