मुंबई : राज्यात मृग बहरातील फळपिकासांठी फळपीक विमा योजना राबविली जाते. यंदा सोमवारअखेर ८५ हजार ३८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी ५२ हजार १२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. गत वर्षाच्या तुलनेत ३३ हजार २६२ शेतकऱ्यांनी जास्त नोंदणी केली आहे.
मृग बहारातील फळपिकांना मदत
राज्यात विविध पिकांचा मृग बहारात (मृग नत्रक्षात) फळे धरली जातात. अशा सर्व फळपिकांचा विमा काढता येतो. यंदा सोमवारअखेर राज्यात ८५ हजार ३८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १४, ०१३, हिंगोलीत १२,५१८, परभणीत १२,२३० शेतकऱ्यांनी विमा नोंदणी केली आहे. ठाण्यात सर्वात कमी ५, कोल्हापुरात २२ तर लातूरमध्ये ६१ शेतकऱ्यांना फळपीक विमा काढला आहे.
७१९ कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम
सर्व फळपिकांचा मिळून ५०,९२८ हेक्टरवरील पिकांचा ७१९ कोटी, ६२ लाख ८६ हजार ९८५ रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्यासाठी शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून ८० कोटी १६ लाख ५० हजार ५८६ रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला आहे. सीताफळ, अंजीर, द्राक्ष, पेरू, लिंबू, मोसंबी, संत्रा, डाळिंब, चिकू आणि हळदीचा विमा शेतकऱ्यांनी काढला आहे.
